देशातील प्रशासकीय सेवेत ठसा उमटविण्यासाठी तरुण-तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे पालिकेने ३३ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चिंतामणी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर नवी मुंबई पालिकेच्या वतीने बेलापूर येथे अद्ययावत प्रशिक्षण संस्था उभारण्यात येणार आहे.

शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतून जास्तीत जास्त सनदी अधिकारी तयार व्हावेत, यासाठी हे प्रशिक्षण केंद्र कार्य करणार आहे. यासाठी लागणारे केंद्र, ग्रंथालय, प्रशिक्षण देणारी संस्था यांची जुळवाजुळव प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

राज्यातील श्रीमंत पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई पालिकेने शहरात काही लक्षवेधी प्रकल्प उभारले आहेत. त्यात मुख्यालय आणि मोरबे धरणाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. भविष्यातील शहर म्हणून ख्याती मिरविणाऱ्या नवी मुंबईत नवे प्रकल्प सुरू करण्यावर पालिकेचा भर आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रयत्नाने ठाणे पालिकेने जुन्या पालिका मुख्यालयात पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या नावे प्रशासकीय सेवा प्रशिक्षण संस्था सुरू केले.

अशाच पद्धतीची प्रशिक्षण संस्था सुरू करणारी ठाणे पालिका ही देशातील एकमेव पालिका आहे. या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षित झाल्यानंतर सनदी अधिकारी झालेले शेकडो तरुण-तरुणी देश आणि राज्यातील शासकीय सेवेत कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत.

ठाण्यातील या प्रशासकीय प्रशिक्षण सेवेत ३०००हून अधिक संदर्भ पुस्तिका, मासिके आणि वृत्तपत्रांचा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय मातब्बरांकडून प्रशिक्षणही दिले जाते. याच धर्तीवर नवी मुंबई पालिका प्रशासकीय सेवा अकादमी सुरू करणार येणार आहे.

गेले सहा महिने याबाबत विचार सुरू आहे. प्रशासकीय सेवेसाठी तरुणांना तयार करण्यासाठी उपलब्ध सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. हे केंद्र पालिकेने चालवावे की खासगी संस्थेला अटी व शर्तीवर द्यावे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई पालिका