News Flash

गणेश विसर्जनासाठी सक्तीचा ‘धनमोदक’

महापालिका क्षेत्रातील २३ विसर्जन स्थळांवर पालिकेने सर्व सोयीसुविधा दिल्या आहेत

महापालिका क्षेत्रातील २३ विसर्जन स्थळांवर पालिकेने सर्व सोयीसुविधा दिल्या आहेत.

पालिकेचे स्वयंसेवक ५०-१०० रुपये मागत असल्याची भाविकांची तक्रार

नवी मुंबई महानगरपालिकेने विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था केली असली, तरीही पालिकेने नेमलेल्या स्वयंसेवकांच्या हातावर ‘लक्ष्मीप्रसाद’ न ठेवल्यास विसर्जनात अडथळे येत असल्याचा अनुभव नवी मुंबईकरांना येत आहे. विसर्जनासाठी ५० ते १०० रुपये देण्याची सक्ती भाविकांना केली जात आहे. यापुढील विसर्जनाच्या दोन दिवसांत असे गैरप्रकार न करण्याची ताकीद स्वयंसेवकांना देण्यात येणार असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे. असे प्रकार घडल्यास विसर्जनस्थळी उपस्थित पालिका अधिकाऱ्याकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रातील २३ विसर्जन स्थळांवर पालिकेने सर्व सोयीसुविधा दिल्या आहेत. विभाग अधिकाऱ्यांनी स्वयंसेवक नेमले आहेत. प्रत्येक विसर्जनस्थळी कमीत कमी १५ पोहणारे स्वयंसेवक आहेत.

स्वयंसेवकांना विसर्जनाच्या दिवसाचे ४४२ रुपये मानधन दिले जाते. त्याबरोबरच टी शर्ट, बम्र्युडा, चहा-नाश्ता, जेवण आणि अंगाला लावण्यासाठी तेल दिले जाते, अशी माहिती उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली. त्यामुळे स्वयंसेवकांनी पैसे मागणे अयोग्य आहे. याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना केली आहे, असेही त्यांनी सांगितले. काही गणेशभक्त स्वखुशीने स्वयंसेवकांना पैसे देतात. परंतु स्वयंसेवकांकडून पैशांसाठी आग्रह केला जात आहे, असे काही भक्तांनी ‘लोकसत्ता’ला कळवले.

स्वयंसेवकांच्या वर्तणुकीबाबत विभाग अधिकाऱ्यांनी त्यांना ताकीद दिली आहे. दीड व पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. परंतु सात दिवसांचे विसर्जन आणि अनंत चतुर्दशीला अशी अडवणूक करण्यात येऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. विसर्जनाची जबाबदारी पालिकेची आहे. त्यासाठी स्वयंसेवक नेमलेले आहेत.त्यांना पालिका योग्य मोबदला देते. सार्वजनिक गणेशमंडळाच्या गणपतींच्या विसर्जनाच्यावेळी म्हणजेच अनंत चतुर्दशीला असे कोणतेही प्रकार घडणार नाहीत याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येईल.

– अंकुश चव्हाण,

अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2017 4:40 am

Web Title: navi mumbai municipal corporation volunteer demand money for ganesh immersion
Next Stories
1 उद्योगविश्व : सुटय़ा भागांचे विश्व
2 फुटबॉल स्पर्धेसाठी महामार्ग पालिकेकडे?
3 विमानतळ निविदा अडचणीत?
Just Now!
X