‘थायरोकेअर’ला नवी मुंबई महापालिकेचा इशारा

नवी मुंबई : पालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयातून यानंतर थुंकीचे नमुने (स्व्ॉब) गोळा केल्यास ‘थायरोकेअर’वर फौजदारी कारवाईचा इशारा पालिकेने दिला आहे.

ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल पालिका क्षेत्रातीला खासगी रुग्णालयातून स्व्ॉब गोळा करण्यास थायरोकेअरला मनाई करण्यात आली असली तरी मुंबई पालिका क्षेत्रातील अनेक खासगी रुग्णालयांचे ‘स्व्ॉब’चे अहवाल थायरोकेअर रोजच देत आहे.शासकीय प्रयोगशाळांवरील करोना रुग्णांचे अहवाल देण्याच्या कामाचा ताण वाढल्याने केंद्र सरकारने काही खासगी प्रयोगशाळांना करोना रुग्णांचे स्व्ॉब नमुने घेण्यास परवानगी दिली आहे. यात नवी मुंबईस्थित थायरोकेअर या आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळेचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या आयसीएमआर संस्थेने स्व्ॉब जमा करण्याची परवानगी दिल्याने थायरोकेअर एमएमआरडीए क्षेत्रातील अनेक पालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे नमुने गोळा करून अहवाल देत आहे. यात पनवेलमध्ये विसंगत अहवाल दिल्याने पनवेल पालिकेने या प्रयोगशाळेला असे नमुने गोळा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

‘मार्गदर्शक तत्त्वांनुसारच काम’

सरकारला सहकार्य करता यावे म्हणून आम्ही अहोरात्र झटून हे अहवाल २४ तासांत देण्याचा प्रयत्न करीत आहोत. गेल्या ९० दिवसांत ४८ हजारांपेक्षा जास्त अहवाल आम्ही दिले आहेत. आम्ही आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करीत आहोत. आमचे सर्व अहवाल हे १०० टक्के वस्तुनिष्ठ आहेत. रुग्णांचे अहवाल काही दिवसांत बदलू शकतात हे आयसीएमआर यापूर्वीच जाहीर केले आहे, असे कंपनीच्या कोविड विभागाच्या प्रमुख डॉ. चैताली निकम यांनी स्पष्ट केले.