महासभेत प्रस्ताव; नेरुळ येथील दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्विकिासाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे

नवी मुंबई नेरुळमधील सारसोळे येथे पालिकेने उभारलेल्या बेकायदा मंडईवर पालिकेकडूनच कारवाई केली जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आसून त्यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. ही मंडई पाडल्यास धोकादायक स्थितीतील दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बाधणीचा मार्ग खुला होऊन तेथील १३६ कुटुंबांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर होणार आहे.

दत्तगुरू या धोकादायक सोसायटीत नागरिक जीव मुठीत घेऊन राहात आहेत. पालिकेकडे वारंवार मागणी करूनही दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बाधणीचा प्रश्न पालिकेकडून सोडवण्यात आलेला नाही. त्यामुळे सात दिवसांत हा प्रश्न निकालात काढला नाही तर पालिका मुख्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक सुरज पाटील यांनी दिला होता. २४ जानेवारीला पालिका आयुक्तांच्या दालनात याबाबत बैठकही घेण्यात आली होती. सिडकोने सोसायटीला देऊ केलेल्या सारसोळे येथील भूखंडावर पालिकेने भूखंड हस्तांतरापूर्वीच बेकायदा मंडई बांधली आहे. त्यामुळे या सोसायटीच्या पुनर्वकिासाचा तिढा सोडवण्यासाठी या परिसरात असलेला ११ मीटरच्या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून रुंदी १५ मीटपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला होता. परंतु बेकायदा मंडई हटविल्याशिवाय दत्तगुरूची पुनर्बाधणी करणे शक्य नव्हते. ही मंडई पाडण्यासाठी नुकत्याच झालेल्या महासभेत प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र सभा तहकूब झाल्यामुळे आता पुढील तहकूब महासभेत हा प्रस्ताव येऊन त्यावरून वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

पालिकेने सारसोळे सेक्टर ६ येथील भूखंड क्रमांक ११ वर ३० ओटले असलेली बेकायदा मंडई उभारली आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे.

सिडकोने दत्तगुरू इमारतीच्या शेजारीच पालिकेने सिडकोच्या भूखंडावर बांधलेली मंडई सात दिवसांत तोडून टाकावी आणि येथील जागा इमारतीच्या पुनर्विकासासाठी द्यावी, असे पत्र सहा महिन्यांपूर्वीच पालिकेला दिले होते.

दत्तगुरू सोसायटीत वारंवार पडझड होत आहे. नियमानुसार दत्तगुरू सोसायटीच्या हक्काचे असलेले ३९४ मीटर क्षेत्रफळ कंडोमिनियम प्लॉटमध्ये देण्याची मागणी सिडकोकडे २००९ पासून केली जात होती. त्याला सिडकोने मंजुरी दिली आणि सोसायटीने ३९४ मीटर क्षेत्राचे पैसेही भरले. परंतु त्यात अडीच एफएसआयद्वारे पुनर्बाधणी शक्य नसल्याने सिडकोकडून या इमारतीला अतिरिक्त जागा देण्याबाबत पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.

सिडकोने १९८७ मध्ये डिमांड रजिस्ट्रेशन स्कीम म्हणजेच डीआरएस योजनेअंतर्गत नेरुळ येथील सेक्टर सहा येथे ए टाइपच्या इमारतींचे नियोजन केले होते. त्या इमारतींत सुमारे ६०० नागरिक जीव मुठीत घेऊन राहात आहेत. मंडई पाडल्यानंतर पालिका याच इमारतीच्या बाजूला मंडई उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आयुक्तांनी ‘लोकसत्ता’ला दिली. त्यामुळे महासभेच्या मंजुरीनंतर ही मंडई पाडली जाणार आहे.

दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पालिकेने ११ मीटर रस्त्याचे रुंदीकरण करून १५ मीटरचा रस्त्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे दत्तगुरु सोसायटीच्या पुर्नविकासाचा प्रश्न निकाली निघणार आहे. मार्केटचे पाडण्याचा प्रस्ताव पालिकेनेच महासभेपुढे आणला आहे. मंजुरी मिळाल्यास दत्तगुरु सोसायटीच्या पुनर्बाधणीचा प्रश्न निघणार आहे.

– सूरज पाटील, नगरसेवक

दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्विकासासाठी रस्त्याचे रुंदीकरण करून ११ मीटरचा रस्ता दोन्ही बाजूंनी वाढवून १५ मीटर करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीच्या शेजारीच असलेली मंडई पाडण्याचा प्रस्ताव  मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. लागूनच असलेल्या भूखंडावर पुन्हा मंडई बांधण्यात येईल. रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंडई पाडण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

– रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका