करोना संसर्ग रोखण्यासाठी पालिका आयुक्तांचा निर्णय

नवी मुंबई</strong> : नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाची लवकरच फेररचना करण्यात येणार असल्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सूचित केले. यात प्रतिनियुक्तीवर निष्णात डॉक्टरांची नेमणूक करणार असल्याचे समजते.

२४ तासांत ३००च्या आसपास रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे २९ जूनपासून ४४ प्रतिबंधित क्षेत्रांत सात दिवस टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. याच वेळी आरोग्य विभागातील ढिला कारभार थांबविण्यासाठी प्रतिनियुक्तीवर काही डॉक्टरांची नेमणूक केली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिसाळ यांच्या बदलीस स्थगिती दिली आहे. या वेळी त्यांनी काही सूचना केल्या आहेत. पालिका आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत. त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. ही सारी स्थिती लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिली आहे.

नवी मुंबई पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचे मानधन मुंबई आणि ठाण्यातील पालिका रुग्णालयांतील डॉक्टरांपेक्षा कमी आहे. त्यामुळे काही तज्ज्ञ डॉक्टर सेवा बजावण्यास तयार नाहीत. सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या वा रुग्णसेवा करण्यास तयार असलेल्या सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक येत्या काळात केली जाणार आहे. यासाठी प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती एकत्रित काम करणार आहे. यात काही खासगी तज्ज्ञ डॉक्टरांनाही समाविष्ट करण्याचा विचार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

सूचना काय?

* ज्येष्ठ नागरिकांना बाहेर फिरण्यास पूर्ण मज्जाव

* पालिकेचे स्व्ॉब अहवाल लवकर येत नसल्याने करोनाग्रस्त नागरिकांमुळे प्रसार

* करोना पॉझिटिव्ह रुग्णाची ओळख स्पष्ट करण्यासाठी ‘ट्रॅकर’

सध्या समूह तपासणीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. करोना नियंत्रणाचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी काही भागात टाळेबंदी जाहीर केली आहे. त्याच वेळी आरोग्य विभागाची फेररचना करण्यात येणार आहे.

-अण्णासाहेब मिसाळ, पालिका आयुक्त