नवी मुंबईत २० दिवस पुरेल एवढा प्राणवायू साठा

नवी मुंबई : शहरात वाढत्या रुग्णसंख्येसह गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले असून कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शहरात पालिका देत असलेल्या आरोग्यसुविधेसाठी २० दिवस पुरेल एवढय़ा ऑक्सिजनची सुविधा तयार ठेवण्यात आली असून महापालिका वाशी प्रदर्शनी केंद्र येथे ऑक्सिजन सुविधेसाठी लिक्विड ऑक्सिजन प्लान्ट तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही राबवण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

शहरात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असून राज्यातील ऑक्सिजन कमतरतेच्या स्थितीची माहिती घेतली असता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरिता सतर्कता राखत  महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील ऑक्सिजन स्थितीचा आढावा घेतला. शहरातील उपचाराधीन रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनचा वापरही वाढला आहे. शहरात पालिका करोना रुग्णालयीन व्यवस्थेसाठी दिवसाला साधारणत: ३ हजार क्युबिक मीटर ऑक्सिजनची गरज लागत आहे. तसेच खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्थेची जबाबदरी त्या त्या रुग्णालयांवर असून अनेक रुग्णालयांत त्यांचे स्वतंत्र ऑक्सिजन प्रकल्प आहेत. मात्र, काही रुग्णालयांतील ऑक्सिजन व्यवस्था अपुरी पडू लागली आहे.

पालिकेने वाशी येथील करोना केंद्रात ७५ अतिदक्षता खाटा निर्माण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी तसेच करोना केंद्रात सध्या असलेल्या खाटांसाठी स्वतंत्र ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची गरज आहे. पालिका आयुक्तांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, रुग्णालयीन ऑक्सिजन व्यवस्थापन नोडल अधिकारी उपायुक्त मनोज महाले तसेच ऑक्सिजन पुरवठादार आदी उपस्थित होते. सद्य:स्थितीत महानगरपालिकेकडे आवश्यक तेवढय़ा प्रमाणात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असून अत्यावश्यक म्हणून २० दिवसांचा अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.

‘ऑक्सिजनपुरवठय़ाची दैनंदिन नोंद ठेवून त्याचे नियमित निरीक्षण करीत त्याचे विहित वेळेत रिफीलिंग करण्याबरोबरच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजन सिलेंडरमध्ये वाढ करण्यात येत आहे,’ अशी माहिती महाले यांनी दिली. महापालिका आरोग्यसुविधेसाठी दिवसाला ३ हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन लागत असून ऑक्सिजनची मागणी वाढत जात आहे. त्यासाठी द्रवरूप ऑक्सिजन प्रकल्प तयार करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.