पालिकेची विशेष मोहीम; ७० मैदानांना झळाळी

विकास महाडिक, नवी मुंबई</strong>

दोन वर्षांपूर्वी झालेल्या फिफा फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने केवळ शहरातील दोन मोक्याच्या मैदानांचा कायापालट करणाऱ्या नवी मुंबई पालिकेने पुन्हा खेळांच्या मैदानांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. पावसाळ्यात गवत, चिखल आणि पाण्याची तळी असे स्वरूप येणाऱ्या शहरातील ७० मैदानांना एक नवी झळाली देण्यात येणार आहे. मोबाइलच्या दुनियेत मशगूल होणाऱ्या बच्चे कंपनीना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी पालिका एक मोहीम राबविणार आहे.

नवी मुंबई जमीन विल्हेवाट कायद्यानुसार सिडकोने शहरात ४६ टक्के जमीन मोकळी ठेवली आहे. त्यामुळे नवी मुंबईत २४८ उद्याने व सुशोभित मोकळ्या जागा आहेत. याव्यतिरिक्त सिडकोकडून ताब्यात घेण्यात आलेली ७० मैदाने असून त्यांच्याकडे गेली अनेक वर्षे दुर्लक्ष झालेले आहे. काही मैदाने हे शाळा, विद्यालय, महाविद्यालये यांनी भाडेपट्टा कराराने संचालनासाठी घेतलेली आहेत मात्र त्यांचा रुबाब ही मैदाने त्यांच्या मालकीची असल्यासारखा आहे. सिडकोने ही मैदाने या शैक्षणिक संस्थांना भाडेपटय़ाने देताना शैक्षणिक संस्थांची वेळ संपल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना ती खुली करावीत असा नियम घातलेला आहे पण या नियमाची कोणतीही संस्था अंमलबजावणी करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांची मक्तेदारी झालेल्या या मैदानांसाठी सुरक्षा रक्षक तैनात केले जात असल्याचे चित्र आहे. सिडको अधूनमधून या संस्थांना कारणे दाखवा नोटीस जारी करते पण राजकीय दबाबापुढे या नोटिसांना नंतर केराची टोपली दाखविल्याचे दिसून येते.

या शैक्षणिक संस्थांच्या ताब्यातील मैदानांव्यतिरिक्त पालिकेच्या ताब्यात ७० मैदाने असून पालिकेने या मैदानात जुजबी सुविधा दिलेल्या आहेत. का मैदानांत तर समाजमंदिर बांहीधून पालिकेने नगरसेवकांची सोय केली असल्याचे दिसून येते. पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नुकतीच शहरातील नागरी समस्यांची पाहणी केली. त्या वेळी या मोकळ्या खेळांच्या मैदानात साचलेले पावसाचे पाणी, वाढलेले गवत आणि तयार झालेली पाण्याची तळी यांचे दर्शन त्यांना झाले.

दोन वर्षांपूर्वी नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये फिफा फुटबॉल स्पर्धा पार पडली होती. त्या वेळी केंद्र व राज्य सरकारच्या आग्रहाखातर पालिकेने सीबीडी व नेरुळ येथील फुटबॉलसाठी सराव मैदाने तयार केलेली आहेत. मात्र या मैदानांकडेही पावसाळ्यात दुर्लक्ष झालेले आहे.

या सराव मैदानांवर पालिकेने लाखो रुपये खर्च केलेले आहेत. त्यामुळे केवळ स्पर्धा अथवा सुशोभीकरणापुरती ही मैदाने मर्यादित न ठेवता ती कायमस्वरूपी परिसरातील खेळाडूांच्या खेळांसाठी उपलब्ध होतील अशी रचना या मैदानात केली जाणार आहे.

पावसाळ्यात पडणारे मुसळधार पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी अनेक मैदानात पाणी वाहून नेणारी यंत्रणा अथवा सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मैदानांचे तळे होत आहे. बारा महिने या मैदांनाची डागडुजी, देखभाल,

सेवा सुविधा आणि लाल मातीचा भराव राहिल्यास मोबाइलमध्ये गुंग होणारी लहान मुले या सुस्थितीत असणाऱ्या मैदांनाचा उपयोग करू शकणार आहेत. त्यासाठी एक विकास आराखडा तयार केला जाणार असून शहरातील खेळांडू बरोबरच आबालवृद्धांना या मैदानांचा वापर करता येणार आहे. तरुणाईला ही मैदाने आकर्षित आणि आवश्यक वाटतील अशा सुधारणा या मैदानात केल्या जाणार आहेत. त्यासाठी पालिका एक विशेष मोहीम राबविणार आहे.

सिडकोकडून ताब्यात घेतल्यापासून या मैदानांवर म्हणावे तसे लक्ष देण्यात आलेले नाही. लहान मुले, तरुणाई मोबाइल खेळांऐवजी या मैदानी खेळांकडे कशी वळेल यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई पालिका