नवी मुंबई : तुर्भे नोडमधील करोना प्रसार रोखण्यासाठी सध्या घरोघरी जाऊन समूह तपासणी केली जात आहे. या पद्धतीचा  करोनाग्रस्त रुग्ण शोधण्यात उपयोग  होत आहे.  तुर्भे स्टोअर भागात करोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. त्यामुळे पालिकेने हीच पद्धत शहरातील प्रतिबंधित भागांत राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

पालिकेने शहरात १२ प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली आहेत. यातील तीन विभाग तुर्भे नोडमध्ये येतात. या प्रतिबंधित  भागात सात दिवस कठोर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत तुर्भे नोडमध्ये समूह तपासणी केली जात आहे.

तुर्भे विभाग हा नवी मुंबईतील  सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला भाग आहे. शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि एपीएमसी बाजार समितीचे आवारही याच भागात आहे. त्यामुळे या भागात करोनाचा प्रसार वेगाने झाला.  मंगळवारी तुर्भे स्टोर, सेक्टर-२१ आणि २२  या परिसरात समूह तपासणी करण्यात आली.

पालिकेच्या वतीने केल्या जात असलेल्या तपासणीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करीत असल्याचे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.