करोनाचा एक रुग्ण उपचाराधीन

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे ३०० खाटांचे वाशी  प्रथम संदर्भ रुग्णालय करोना रुग्णालय करण्यात आले. त्यामुळे नऊ महिन्यांपासून ते सामान्य रुग्णांसाठी बंद करण्यात आले होते. नागरिकांच्या मागणीनंतर हे रुग्णालय पुन्हा सर्वसामान्य रुग्णांसाठी करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. आता फक्त करोनाचा रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर हे रुग्णालय इतर रुग्णांच्या सेवेत पूर्ववत सुरू होईल.

पालिकेने काही दिवसांपासून या रुग्णालयात सामान्य आजारांसाठी सेवा सुरू केली आहे. सध्या ९० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. ते सामान्य आजारांसाठीचे रुग्णालय पूर्ववत करण्याचे ठरविले आहे. करोनासाठीच्या अत्यवस्थ रुग्णांसाठीची १७५ खाटांची सुविधा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली असून येथील प्राणवायू खाटांबरोबरच अतिदक्षता खाटांसाठीचे नवीन प्रवेश बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे १७५ करोना रुग्णांची संख्या कमी होऊन ती आता एक रुग्णावर आली आहे. हा रुग्ण बरा झाल्यानंतर या ठिकाणी करोना रुग्णांना प्रवेश दिला जाणार नाही. उपचार सुरू असलेल्या करोना रुग्णाबाबत लवकर निर्णय घेऊन पालिकेचे हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सामान्य रुग्णालय म्हणून सुरू करेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली.

वाशीतील ३०० खाटांचे रुग्णालय पूर्णत: करोना रुग्णालय केले होते. १७५ रुग्णांपैकी फक्त १ करोना रुग्ण या ठिकाणी शिल्लक आहे. पुढील काही दिवसांत या रुग्णाला घरी सोडल्यानंतर  हे रुग्णालय सामान्य रुग्णालय होईल. त्यानंतर पूर्ण क्षमतेने सामान्य रुग्णांवर या ठिकाणी उपचार करण्यात येतील.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका