परिवहनला घरघर; तोटा टाळण्यासाठी विस्तारीकरणाचे बेत रद्द

शेखर हंप्रस, नवी मुंबई</strong>

सुरुवातीच्या काळात नवी मुंबई शहराची जीवनवाहिनी असा लौकिक असणाऱ्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाला गेल्या काही वर्षांत विस्तारलेल्या रेल्वेच्या जाळ्याने एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या बदलत्या काळाची पावले उचलून नवी मुंबई परिवहनने विस्तारीकरणाचे सारे बेत रद्द करून आहे त्याच सेवा उत्तम रीतीने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे मुंबई आणि उरण तसेच उरण व पनवेलच्या अंतर्गत भागात विस्ताराला खो बसला असून  शहराअंतर्गत वाढविण्यात येणाऱ्या बसच्या फेऱ्याही  वाढविणे अशक्य होणार आहे. अतिरिक्त बस खरेदीही तूर्तास थांबिवण्याचा निर्णय परिवहनने घेतला आहे.

२३ जानेवारी १९९६ ला सिडकोची परिवहन सेवा असलेल्या बीएमटीसीचे रूपांतर एनएमएमटी अर्थात नवी मुंबई परिवहन उपक्रमात झाले. तेव्हा नवी मुंबईत रेल्वे सेवा नसल्याने या बस सेवेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई परिवहनची उलाढाल तीनशे कोटींहून अधिक झाली.

मात्र ट्रान्सहार्बर म्हणजेच ठाणे-पनवेल आणि ठाणे-वाशी उपनगरी रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर नवी मुंबई परिवहनच्या प्रवासी संख्येवर त्याचा परिणाम झाला. अलीकडेच नेरुळ-खारकोपर मार्गावर रेल्वे सेवा सुरू झाली आहे. त्याचा नवी मुंबई परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. दररोजच्या उत्पन्नात दोन ते अडीच लाखांची घट येऊ लागली आहे. नवी मुंबई परिवहन सेवेची वातानुकूलित सेवा अतिशय फायद्यात होती, मात्र तिचे उत्पन्नही आता रोडावले आहे.  त्यामुळे या सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे.  परिणामी, नेहमी फायद्यात असणाऱ्या नवी मुंबई परिवहनला सध्या तोटा सहन करावा लागत आहे.

अतिरिक्त निधी देण्यास पालिकेचा नकार

परिवहन प्रशासनाने या संकट काळात महापालिका प्रशासनाकडे तातडीने ५० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र महापालिका प्रशासनाचा त्यास विरोध आहे. केवळ अनुदान अथवा मदतीवर ही सेवा किती काळ चालणार, असा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे तूर्त कोणतीही मदत मिळत नसल्याने उधारीवर डिझेल घेऊन नवी मुंबई परिवहनला आपला गाडा हाकावा लागत आहे.

ट्रान्सहार्बर सेवेमुळे नवी मुंबई परिवहनच्या उत्पन्नाला मर्यादा आल्या होत्या, त्यात आता नेरुळ खारकोपर लोकल सुरू झाल्याने एनएमएमटी उपक्रमाचा तोटा वाढला आहे. मात्र त्यावर उपाय म्हणून आम्ही आता अंतर्गत सेवेला (रिंग रूट) प्राधान्य देण्याच्या विचारात आहोत. सध्या तरी नवीन काही वाढवण्यापेक्षा आहे ती सेवा कशी उत्तमोत्तम देण्यात येईल याचा विचार करण्यात येईल.

शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक.