X

राडारोडय़ापासून पेव्हर ब्लॉक

शहरात रात्री राडारोडा टाकून पसार होणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तर सुरू करण्यात आली आहेच.

पूनम धनावडे

नवी मुंबई पालिका प्रकिया प्रकल्प उभारणार; ७ कोटींचा खर्च अपेक्षित

मोकळे भूखंड, कांदळवनांवर अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या राडारोडय़ापासून पेव्हर ब्लॉक तयार करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. तुर्भे येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी सात कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

शहरात रात्री राडारोडा टाकून पसार होणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तर सुरू करण्यात आली आहेच, शिवाय पुर्नवापरासाठी प्रकिया प्रकल्प उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबईचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे, मात्र शहरात विनापरवानगी कुठेही टाकण्यात येणाऱ्या राडारोडय़ामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा येत आहे.

शहराच्या सौंदर्यात अडथळा निर्माण करणाऱ्या राडारोडय़ाची विल्हेवाट लावून त्यापासून उपयुक्त वस्तू निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. तुर्भेतील कचराभूमीच्या बाजूला असलेल्या ३४ एकर जमिनीपैकी ५ एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील विकासक व इतर नागरिकांनी राडारोडा जमा करणे अपेक्षित आहे. किती शुल्क आकारणी करण्यात येईल याचा निर्णय सर्वसाधारण सभेत होईल, अशी माहिती पालिकेने दिली. महिन्याभरात निविदा मागविण्यात येणार असून येत्या ९ महिन्यांत या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. ७ कोटी रुपये खर्चाची तरतूद आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे या पालिकांतदेखील या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले असून अद्याप त्यांनी प्रकल्पाची उभारणी केलेली नाही.

प्रकल्पाचे स्वरूप

* राडारोडा प्रक्रिया यंत्रे एका तासात २० टन राडारोडय़ावर प्रक्रिया करतील. दिवसाला १५० टनांपर्यंत राडारोडय़ावर प्रक्रिया करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.

* जमा करण्यात आलेला राडारोडा यंत्रामध्ये टाकून त्याचा भुगा करण्यात येईल. हा भुगा धुवून नंतर यंत्राद्वारे सिमेंट, रेती, खडीचे वर्गीकरण करण्यात येईल. यामध्ये लोखंडी, लाकडी वस्तूही बाजूला काढण्यात येतील.

* तयार झालेल्या कच्च्या मालापासून पेव्हर ब्लॉक तयार करण्यात येईल. या यंत्रणेच्या उभारणीसाठी ७ कोटी खर्च येणार असून देखभालीसाठी वेगळा खर्च करण्यात येणार आहे.

शहरात निर्माण होणाऱ्या राडारोडय़ासाठी तुर्भे येथे प्रक्रिया प्रकल्प उभारून त्यापासून उपयुक्त वस्तू तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.   – मोहन डगांवकर, शहर अभियंता, महापालिका