शनिवारी लसीकरण सुरू केल्यानंतर नवी मुंबईत प्रत्येक दिवशी ४०० जणांचे लसीकरण करण्यात येणार होते. मात्र लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. शनिवारी ३१३, मंगळवारी २३७ व बुधवारी ३६१ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लसीकरणाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करोनायोद्धय़ांना केले आहे.
नवी मुंबईत चार केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. यात प्रत्येक केंद्रावर शंभर असे चारशे जणांचे नियोजन आहे. शनिवारी, १६ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी ४०० पैकी ३१३ जणच लसीकरणास उपस्थित राहिले. यातील तीन जणांना सौम्य लक्षणांशिवाय काही त्रास जाणवला नाही. असे असताना मंगळवारी करण्यात आलेल्या लसीकरणाकडे करोनायोद्धय़ांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. फक्त २३७ जणांनी लसीकरण करून घेतले. त्यामुळे यापुढे कसा प्रतिसाद मिळतो याची भीती प्रशासनासमोर होती. मात्र बुधवारी झालेल्या लसीकरणात ३६३ जणांचे लसीकरण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. लसीकरण करणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी पालिकेच्या वतीने योग्य खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
तीन दिवसातील लसीकरण
१६ जानेवारी
३१३ ७८.२५ %
१९ जानेवारी
२३७
६८ %
२० जानेवारी
३६३
९१ %
एकूण
९१३
७५ %
नवी मुंबईत लसीकरण चांगल्या पद्धतीने व्हावे म्हणून पालिकाचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात इतर महापालिकांच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळत असून आज लसीकरणात चांगली वाढ झाली असून ९१ टक्के लसीकरण करण्यात आले आहे.
– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 12:02 am