प्रस्ताव स्थगित ठेवल्याने शिवेसना नगरसेवकांचा सभात्याग

नवी मुंबईतील वाहनतळाची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने बेलापूर येथे बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या वाहनतळ उभारणीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता, मात्र या वेळी सत्ताधारी पक्ष निवडक ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला. सभापतींनी या प्रस्तावावर चर्चा न करता तो स्थगित केल्याने सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे सेना नगरसेवकांनी स्पष्ट केले.

बेलापूर, सेक्टर- १५ मध्ये बहुमजली वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी एकूण २७ कोटी ६६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच प्रस्तावात ‘मे. यूसीसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या ठेकेदाराला पात्र ठरवले आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. मात्र या वेळी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक स्थायी समिती सदस्य रवींद्र इथापे यांनी ‘महावीर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ यांचा ४०  पानांचा प्रस्ताव आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी हवा आहे.  त्यासाठी हा प्रस्ताव स्थगित करण्याची मागणी केली. याला सभापती नवीन गवते यांनी मान्यता दिली. यावर शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी यांनी आक्षेप घेत या प्रस्तावावर चर्चेची मागणी केली.

तसेच दुसऱ्या ठेकेदाराच्या नावाने हा प्रस्ताव आला असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही सदस्य ‘महावीर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’चा आग्रह का धरत आहेत. ठेकेदारांचे एजंट आहेत का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

कोणत्या कारणासाठी हा प्रस्ताव स्थगित ठेवत आहेत याची माहिती द्यावी. तसेच या बहुमजली वाहनतळासाठी दोन वेळा पुन्हा निविदा काढलेली आहे. त्यामुळे या प्रस्तावाला दिरंगाई झाली आहे. अजून पुन्हा वेळ वाढवून याला खो घालू नये.  हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी केली. या प्रस्तावावर चर्चा करून यात राजकारण करून विकासकामांना खीळ घालू नये. ठेकेदार बदलण्यासाठी हा कट असेल तर आम्ही सहन करणार नाही, यावर चर्चेची मागणी करीत सेना नगरसेवकांनी स्थायी समिती सभेवर बहिष्कार टाकला.

या वेळी शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सांगितले की, महापौरांनी ‘महावीर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ यांनाही प्राधान्य द्यावे, या अनुषंगाने पत्राद्वारे निवेदन दिले होते. ‘महावीर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ यांना एक सुनावणी करावी, अशी मागणी महापौर आणि आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार बुधवारी कागदपत्रे सादर करण्यात आली.

सभा एक तास उशिराने

आज महापालिकेत शहराच्या विकास आराखडय़ासंदर्भात नगरसेवकांची विशेष सभा घेण्यात आली. याविषयी प्रशासकीय वेळेआधी सकाळी ९ वाजता स्थायी समितीची सभा घेण्याचे नियोजन होते, मात्र ही बैठक सभापती उपस्थित नसल्याने एक तास उलटून गेल्यानंतरही सुरू झाली नव्हती. सुमारे १०.२० वाजता बैठक सुरू झाली. सभापतींनी विकास आराखडय़ासंदर्भात बैठक होती, त्या बैठकीमध्ये उपस्थिती दर्शविल्याने येथे येण्यास उशीर झाल्याचे सांगितले. मात्र या वेळी एक विशेष सभा बोलावली असताना त्याच दिवशी दुसरी सभा का घेतली गेली, अशी चर्चा सुरू होती.