८ लाख ४८ हजार रुपयांची दंडवसुली

नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित पाटर्य़ामध्ये मद्याचे पेग रिचवून स्वत: वाहन चालवीत घरी परतणाऱ्या ४२४ तळीरामांची झिंग नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी उतरविली. ३१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान पहाटे ५ वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. वाहतूक विभागाच्या ३६५ कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात टळले.

नवी मुंबईतील प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात होते. यंत्राद्वारे संशयित वाहनचालकाची तपासणी करून मद्यपान केल्याचे आढळल्यास मोटार अधिनियम १८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलाच्या तिजोरीत सुमारे ८ लाख ४८ हजार रुपयांची रक्कम जमा झाली.

नवी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र पोलीस उपायुक्तपद निर्माण करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी नितीन पावार यांच्याकडे आहे. पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. आयुक्त व सह आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त, शहर पोलीस व वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील शहरात गस्त घालत होते. ठिकठिकाणच्या पाटर्य़ामध्ये कायद्याचे उल्लघंन होत आहे का, यावर त्यांनी नजर ठेवली होती. ३१ डिसेंबर २०१६ला ३१५ मद्यपींवर कारवाई करण्यात आली होती. मात्र यंदा त्यामध्ये वाढ झाली असून ४२४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

पालिका मुख्यालयासमोर जल्लोष

सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षांचे दिमाखात स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री नवी मुंबईकरांनी शहरातील देखण्या पालिका मुख्यालयासमोर प्रचंड गर्दी केली. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. मुख्यालयाच्या इमारतीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. नवी मुंबईचा रत्नहार म्हणून ओळखला जाणारा पामबीच मार्गही रोषणाईने झगमगला होता. रोषणाईच्या पाश्र्वभूमीवर सेल्फी घेण्यासाठी पालिका मुख्यालयाबाहेरील हिरवळीवर हजारोंच्या संख्येने तरुण जमले होते.

१ जानेवारी हा पालिकेचा वर्धापनदिन असतो. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०१७ला रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू होणार असल्याने विद्युत रोषणाईसह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. परंतु यंदा मात्र फक्त रोषणाई करण्यात आली. त्यामुळे फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला. विविधरंगी फुगे, आगळेवेगळे मुखवटे आणि विविध आकारांचे चष्मे घालून फोटो काढण्यात तरुण मग्न झाले होते. शहराच्या विविध भागांत राहणारी मित्रमंडळी मुख्यालयासमोर जमली होती. शहरात बेलापूरमधील पार्कसह विविध हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. नेरुळ जिमखाना येथेही पार्टीसाठी गर्दी झाली होती. पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

शहरामध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत कडक बदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वच वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जास्त मद्यपींवर कारवाई करण्यात आली. तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये यासाठी जनजागृतीदेखील करण्यात आली. वाहतूक  पोलीस व शहर पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांकडून दंड जमा करण्यत आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यांनतर त्यांच्यावर न्यायलय योग्य ती कारवाई करणार आहे.          -नितीन पवार, उपआयुक्त, वाहतूक शाखा

नेरुळमध्ये फक्त एकाच ठिकाणी किरकोळ हाणामारी झाली. शहरात अन्यत्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मोठय़ा उत्साहात व जल्लोषात नवीन वर्षांचे स्वागत करण्यात आले.   -डॉ. सुधाकर पाठारे, पोलीस आयुक्त परिमंडळ १