महापालिका निवडणुकीपूर्वी पोलीस यंत्रणा सतर्क

नवी मुंबई: महापालिका निवडणुकीचे पडघम अद्याप वाजणे सुरू झाले नसले तरी पोलिसांची तयारी मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे. यात संवेदनशील ठिकाणे किती, तडीपार लोकांची यादी बनवणे, राजकारणाशी संबंधित आणि शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीचे शस्त्र जमा करून घेण्याची कामे सुरू झालेली आहेत. या संदर्भात पोलीस ठाणे पातळीवर आढावा बैठकाही सुरू झाल्या आहेत.

६ मे रोजी नवी मुंबई महापलिकेच्या महापौरांची मुदत संपणार आहे. तत्पूर्वी मनपा मतदान निकाल आदी निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. अद्याप प्रभाग आरक्षण प्रक्रिया जाहीर झाली नसल्याने राजकीय पक्षांत निवडणुकीची धाकधूक असली तरी धामधूम सुरू होण्यास अजून अवधी आहे.

दरम्यान, पोलिसांनी मात्र निर्भयपणे निवडणुका पार पाडाव्यात म्हणून तयारी सुरू केली आहे. यामध्ये निवडणुकीदरम्यान होणारा गोंधळ लक्षात घेऊन गुंड प्रवृत्तीच्या लोकांची यादी काढून त्यांना तडीपार वा प्रतिबंधित कारवाई करण्यासाठी त्यांची यादी बनवणे सुरू आहे. तसेच नवी मुंबईतील संवेदनशील ठिकाणे आणि मतदान केंद्राची नोंद करून त्याप्रमाणे बंदोबस्त ठरवणे आदी संदर्भातील कामे सुरू झाली आहेत.

निवडणुकीदरम्यान राजकारणाशी संबंधित व्यक्तींची वैयक्तिक शस्त्रे जमा करून घेतली जातात. त्यांची यादी करण्याचेही काम सुरू असून आता यात ऐन निवडणुकीस कोण उभे राहते हे ठरल्यानंतर अंतिम यादी बनविण्यात येणार आहे.

नवीमुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एक हजार ५७३ शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत.  यापैकी १२६ परवाने रद्द करण्यात आलेले असून या १२६ पैकी १०४ जणांची शस्त्रे जमा करून घेण्यात आलेली आहेत. या १२६ मध्ये परवाना ज्यांच्या नावाने आहे, ती व्यक्ती मरण पावणे, परवाना नूतनीकरण न करणे आदी कारणांनी ती रद्द करण्यात आलेली आहेत.

निवडणूक कार्यक्रम कधीही जाहीर होऊ  शकतो. मात्र पोलीस विभागाने आपली कामे कागदोपत्री सुरू केली असून त्यासाठी पोलीस ठाणे पातळीवर आढावा बैठका घेण्यात येत आहेत. निवडणूक निर्भयपणे पार पडावी हा आमचा उद्देश आहे.

-पंकज डहाने, पोलीस उपयुक्त, परिमंडळ एक