नवीमुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या ३० जणांना करोना झाला तर त्यांच्या एकूण ३६ नातेवाईकांना असा ६६ जणांना करोना झाला आहे. या पैकी ४६ जण करोना मुक्त झाले असून पैकी ५ जण कामावर रुजूही झालेले आहेत अशा जिगरबाज पोलिसांच्या मुळे पोलीस विभागाची मान उंचावली आहे.

विशेष म्हणजे या सर्वांशी पोलीस आयुक्त, सह आयुक्त सर्व उपायुक्त यांनी थेट संपर्क ठेवला होता. तसेच सध्या सर्व उच्च पदस्थ अधिकारी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची विशेषत्वाने काळजी घेत असल्याने पोलिसांचे मनोबलही वाढण्यास मदत होत आहे.

करोना विरोधातील लढाईत पोलीस आणि डॉक्टर यांनी सर्वात महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि सध्याही बजावत आहेत हे करत असताना अनेक डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली त्यात अनेक जणांना प्राणही गमवावे लागले.

नवीमुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कार्यरत असलेल्या २९ पोलीस कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याला व त्यांच्या कुटुंबातील एकूण ३६ जणांना कोरोना झाला होता. गुरुवारपर्यंतची ही आकडेवारी असून आता पर्यत २१  पोलीस कर्मचारी करोना मुक्त झाले असून ५ जण कामावर रुजूही झालेले आहेत.

सध्या ८ पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या ११ कुटुंबीयांवर उपचार सुरु आहेत. एका अधिकाऱ्यासह २१ कर्मचारी आणि त्याचे २४ नातेवाईक असे ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे अशी माहिती प्रशासकीय उपायुक्त शिवाराज पाटील यांनी दिली.