नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २०१६च्या तुलनेत २०१७मध्ये गुन्ह्य़ांत घट झाली आहे. २०१६ मध्ये चार हजार ८०१ गुन्हे दाखल झाले होते, तर २०१७ मध्ये चार हजार ५६१ गुन्हे दाखल झाले. गुन्ह्य़ांच्या संख्येत २४० ने घट झाली आहे. बलात्कार, सोनसाखळी चोरी, घरफोडी, चोरी, मोटार अपघात यात मोठी घट झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांत २०१७मध्ये खुनांचे ४३ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ४० गुन्हे उघडकीस आणण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले. दरोडय़ांचे आठ गुन्हे दाखल झाले असून आठही गुन्ह्य़ांचा तपास लागला आहे. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांत २६ने घट झाली आहे. २०१६ मध्ये ११८ तर सन ९२ गुन्हे दाखल झाले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने १९ गुन्हे दाखल केले. त्यात २८ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून ५४ किलो ७४६ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यापैकी ४६५ मेथाफेटामाइन हे रसायन प्रथमच आंतररराज्य टोळीकडून जप्त करण्यात आले. ५३.२ किलो गांजा जप्त करण्यात आला.

सन २०१५, २०१६ व २०१७ च्या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून एक कोटी २७ लाख ८८ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याचप्रमाणे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याखली १२ गुन्ह्य़ांत तीन मुली व १७ महिलांची सुटका करण्यात आली. ३० आरोपींना गजाआड करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. बेकायदा हत्यारे बाळगणाऱ्या २९ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १५ गावठी कट्टे व ६ पिस्तुले, ४ रिव्हॉल्वर, ५७  जिवंत काडतुसे अशी अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

दोषसिद्धीचे प्रमाण २०१७ मध्ये ४५ टक्के तर २०१६ मध्ये ६० टक्के होते. दोषसिद्धीच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र सत्र न्यायालयातील खटल्यांत दोषसिद्धीचे प्रमाण २०१७ मध्ये  २९ टक्के तर २०१६ मध्ये हेच प्रमाण १४ टक्के

होते. फरार आरेापींपैकी एका आरोपीला अटक करण्यात २०१६ मध्ये यश आले होते, मात्र २०१७ मध्ये ४४ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी पकडल्यास ५०० रुपये व फारार आरोपी पकडल्यास १००० रुपये अशी बक्षीस जाहीर करण्यात आली आहे.

मोक्काकायद्याअंतर्गत ८ गुन्ह्य़ांत कारवाई

मोक्का कायद्याअंतर्गतसन २०१६ मध्ये ३ गुन्ह्य़ांत कारवाई करण्यात आली होती. २०१७ मध्ये यात वाढ होऊन संख्या आठवर पोहोचली आहे. आठ गुन्ह्य़ांतील ४६ गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला आहे. विक्रांत चव्हाण, अमोल बाळासाहेब दुशिंग, यांच्यावर इतरांवर कारवाई करण्यात आली आहे.