वाहतुकीत बदल; विसर्जनस्थळांवर पोलिसांची करडी नजर

गणपतीविसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून, आवश्यक ठिकाणी खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी शहर पोलीस व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त असून विसर्जनादरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मंगळवारी पाच दिवसांच्या तर गुरुवारी गौरीसह सात दिवांसाच्या गणपतींचे विर्सजन होणार आहे. गणेशचतुर्थीपासूनच शहरात चोख बंदोबस्त आहे. आगमन शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात झाले आहे. विसर्जनातही शिस्त कायम राहावी आणि मिरवणुकांना गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. गौरीसोबत विसर्जित केल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीची संख्या जास्त असल्याने ३१ ऑगस्टला विसर्जनस्थळी आणि रस्त्यांवर गर्दी होणार आहे. नवी मुंबईत २३ हून अधिक ठिकाणी विसर्जन केले जाणार आहे. पालिका प्रशासनाने सर्वच विसर्जनस्थळांवर आवश्यक सुविधा पुरवल्या आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक व शहर पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतली आहे.

विसर्जनस्थळांकडे जाणाऱ्या सर्वच मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेण्यात आला आहे. तर काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वाशी विभागासह, जुईनगर, सानपाडा, कोपरखैरणे येथेही मोठय़ा प्रमाणात विसर्जन होते. यानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाशीतील शिवाजी चौक ते विसर्जन तलावापर्यंतचा एक मार्ग गणेशमूर्तीसाठी राखीव ठेवला जाणार आहे. त्याशिवाय वाशी कोपरखैरणे मार्गावरही पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल, विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशमूर्तीच्या मार्गात अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. जुईनगरमधील गावदेवी चौक व माणिकराव बडोबा पाळकर चौकाच्या दिशेने येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या मार्गावर विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. तर कोपरखैरणे येथील कलश उद्यान चौक ते वरिष्ठा चौक, सिरॉक प्लाझा ते शंकर मंदिर या मार्गावर वाहनांसाठी नो पार्किंग आहे. तर वरिष्ठा चौकापासून विसर्जन तलावाच्या मार्गावर विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.

जीवरक्षक, अग्निशमनदल सज्ज

सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. साहाय्यक आयुक्त व विभाग अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली विसर्जनस्थळी जीवरक्षक, स्वयंसेवक यांच्यासह अग्निशमन दलही कार्यरत राहणार आहे. मोठय़ा गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी तराफे आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनस्थळी पुरेशा विजेची आणि जनित्रांची सोय करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचारांची सोय आहे. ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवले असून प्रसादाची फळे ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. हा प्रसाद आणि फळे गरजूंना देण्यात येणार आहेत. निर्माल्याची वाहतूक रोज स्वतंत्र वाहनाद्वारे करण्यात येणार आहे. सूचनांसाठी ध्वनिक्षेपकांची सोय केली आहे.

 

पाच आणि सात दिवसांच्या गणपती विसर्जनाला आणि अनंत चतुर्दशीला सर्वच विसर्जन स्थळांवर व मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनासाठी गणेशमूर्ती नेल्या जात असताना, वाहतूककोंडी होऊ  नये म्हणून आवश्यक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. काही मार्गावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, काही मार्गावर वाहने थांबवण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंबंधीची अधिसूचना वाहतूक शाखेमार्फत विभागनिहाय जारी करण्यात आली आहे. यानुसार विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी बंदोबस्तावरील पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

– नितीन पवार, पोलीस उपायुक्त, वाहतूक