कोपरखैरणेत घरपोच सेवा देण्यासाठीही किराणा दुकानांना मज्जाव
नवी मुंबई : घरपोच सेवा न देताच दुकाने बंद ठेवण्याची वेळ कोपरखैरणेतील दुकानदारांवर आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची मॉल वा दुकानांमधून थेट विक्री न करता घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) देण्याची मुभा नवी मुंबई पालिकेने नव्याने लागू केलेल्या टाळेबंदीत दिली आहे. परंतु, नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी कोपरखैरणेतील किराणा मालाची दुकाने सक्तीने बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा देण्यासाठी पालिकेने किराणा दुकानदारांना मुभा दिली आहे. त्यामुळे अनेकांनी सकाळी दुकाने उघडली होती. दुकानातील माल ग्राहकांपर्यंत पुरविण्यासाठी ती उघडी ठेवण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी स्वत:चाच नियम वापरून ती बंद करण्यास भाग पाडल्याची प्रतिक्रिया येथील दुकानदारांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.
यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घरपोच सेवा देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्याचे पालिकेचे कोणतेही आदेश नाहीत, असे स्पष्ट केल्याने पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले.
नवी मुंबईत ३ ते १३ जुलै या काळात नव्याने टाळेबंदी लागू केली आहे.
टाळेबंदीच्या काळात मॉल आणि दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंची थेट विक्री नागरिकांना करता येणार नाही. मात्र, या काळात घरपोच सेवा सुरू ठेवता येईल, असे पालिकेने नव्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यानुसार कोपरखैरणेतील अनेक किराणा दुकानदारांनी दुकाने उघडली. मात्र, पोलिसांनी ती सक्तीने बंद करण्यास भाग पाडले.
नवी मुंबईत ज्या भागात करोनाचा प्रभाव अधिक आहे तिथे २९ जून ते ५ जुलै या काळात टाळेबंदी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर दोन दिवस संसर्गात वाढ झाल्याने ३ ते १३ जुलै या काळात संपूर्ण शहरात कठोर टाळेबंदी जाहीर करण्यात आली. नव्याने लागू केलेल्या टाळेबंदीच्या नियमावलीत जीवनावश्यक वस्तूंची मॉल, सुपरमार्केटमधून थेट विक्री (काऊंटर सेल) करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यात छोटय़ा किराणा दुकानांचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. मात्र, गर्दीची शक्यता लक्षात घेऊन किराणा दुकानदारांनी घरपोच सेवेची तयारी दर्शवली होती. त्यावर बुधवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अडचणी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया किराणा दुकानदार आदेश भाटिया यांनी दिली.टाळेबंदीच्या नावाखाली वारंवार नवनवे आदेश काढले जात आहेत. त्याचा अधिकारी सोयीचा अर्थ लावत असल्याची प्रतिक्रिया आरती पाटील यांनी व्यक्त केली.
दोन आदेशांमुळे गोंधळ
’ २९ जून ते ५ जुलै या काळात लागू केलेल्या टाळेबंदीच्या नियमावलीत जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे ‘बिग बाजार’ ‘डी-मार्ट’ आणि ‘रिलायन्स फ्रेश’ मोठी विक्रीकेंद्रे सुरू होती.
’ मात्र, ३ ते १३ जुलै या काळात लागू केलेल्या टाळेबंदीच्या नियमावलीत मॉल आणि सुपरमार्केट बंद राहतील. मात्र, घरपोच सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. यात छोटय़ा किराणा दुकाने वा भाजी दुकानांचा उल्लेख नव्हता.
दुकाने सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्याचा आदेश पालिकेने काढलेला नाही. किराणा भाजी दुकाने, मेडिकल पिठाची चक्की इत्यादी सुरू राहतील.
-अशोक मडवी, साहाय्यक आयुक्त पालिका
औषध दुकाने आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश आम्हाला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. ज्यांना जीवनावश्यक वस्तू हव्या आहेत ते घरपोच सेवेचा लाभ घेऊ शकतात.
-सूर्यकांत जगदाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 1:18 am