नवी मुंबई पोलीस दलाला यंदा श्रीगणेश पावला आहे. साडेतीन हजार पोलीस बळ असलेल्या नवी मुंबई पोलीस दलाला यंदा गणेशोत्सवामध्ये साप्ताहिक सुटी जाहीर झाली आहे. या निर्णयाबाबत पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत दीड महिना अगोदर घेतलेल्या आढावा बैठकांच्या सत्रामुळे पोलिसांना यंदा साप्ताहिक सुटीचा आनंद लुटता येणार आहे.
पोलीस दलावर सणासुदीच्या काळात असणारा ताण हा नेहमीचा आहे. सुमारे २२ लाख लोकसंख्येसाठी केवळ तीन हजार पाचशे पोलीस तैनात असल्याने सरासरी एका पोलिसावर ६२० नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. प्रत्येक सणाला या पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टय़ा रद्द होतात. मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी ही प्रथा मोडली आहे. ऐन गणेशोत्सवात पोलिसांची साप्ताहिक सुटी रद्द न करण्याचा वटहूकूम त्यांनी काढल्याने यंदा उत्सवी काळात पोलिसांना आठवडय़ातून एक दिवस कुटुंबीयांसोबत राहता येणार आहे.
रंजन यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन केले होते. अनेक मंडळांनी या तिसऱ्या डोळ्याची सोय केल्याने पोलिसांवरील भार काहीसा कमी झाला आहे. सध्या हा तिसरा डोळा पोलिसांचा हक्काचा सहकारी म्हणून साथ देत आहे. अनंत चतुर्दशी या एकाच दिवशी मोठय़ा प्रमाणात श्रींचे विसर्जन होणार असल्याने नवी मुंबई पोलिसांची या एकाच दिवशी साप्ताहिक सुटी रद्द करण्यात आली आहे.