शुक्रवारच्या कारवाईने नागरिकांमध्ये सतर्कता

नवी मुंबई : शहरातील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शुक्रवारी नवी मुंबई पोलिसांनी पालिका प्रशासनाच्या मदतीने ‘ऑल आऊट’ मोहीम राबवली. यात मुखपट्टी न घातलेल्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून इनेक ठिकाणी वादाचे प्रसंगही घडले. दक्षता पथकांनी नागरिकांना यावेळी करोना त्रिसूत्रीच्या पालनाचे आवाहन केले.

शुक्रवारी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत ही मोहीम राबवली. यात ६०० पोलीस कर्मचारी १०० पालिका कर्मचारी आणि २०० पोलीस मित्रांचा सहभाग होता. ही मोहीम दिघा ते सीबीडी या परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रात पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शखाली राबविण्यात आली.  यात सामाजिक अंतर न पाळणारे, मुखपट्टी न घालणाऱ्या अनेकांना कारवाईला सामोरे जावे लागले.  वाहने सिग्नलवर थांबल्यानंतर दक्षता पथक वाहनचालकांचा ताबा घेत होते.  सर्वाधिक कारवाई ही सिग्नल आणि एपीएमसीमध्ये करण्यात आली. या पथकाला पाहून रिक्षाचालकांनी हनुवटीवर असलेली मुखपट्टी तोंडावर चढवली. पोलिसांच्या या ऑल आऊट मोहिमेमुळे शहरात निर्धास्त फिरणाऱ्या नागरिकांवर वचक निर्माण झाला आहे.  नाईलाजास्तव आशा कारवाया कराव्या लागत आहेत. नागरिकांनीही तेवढय़ाच गांभीर्याने वागावे असे आवाहन परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी केले आहे.