तळोजा औद्योगिक वसाहतीतील रेक्सिन कंपनीच्या पनवेल, तळोजा, खांदेश्वर आणि डायघर कार्यालयातील व्यवस्थापकांना मारहाण केल्याचे प्रकरण पोलिसांना भोवले आहे. या प्रकरणी तळोजा औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांची बदली करण्यात आली आहे. रेक्सिन कंपनीच्या वरिष्ठांविरोधातील गुंडगिरीला ठेचून काढण्यात पोलिसांना अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्रालयानेच, गुंडांना पाठीशी घालण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नसल्याचा सज्जड दम दिल्यानंतर काही तासांतच मोरे यांच्या हाती बदलीचे पत्र ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून मोरे यांच्याजागी रवींद्र बुधवंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर मोरे यांना सागरी सुरक्षा विभागात पाठविण्यात आले आहे.
रेक्सिन कंपनीचे व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यातील कंत्राटाच्या वादातून चार व्यवस्थापकांना विविध ठिकाणी गाठून मारहाण करण्यात आली होती. याबाबत कंपनीने संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये वारंवार तक्रारी दिल्या आणि संशयितांची नावे तळोजा पोलिसांनी देण्यात आली; परंतु पोलिसांची ढिम्म यंत्रणा हलली नाही. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापकांना झालेल्या मारहाणीच्या घटनांची माहिती मुख्य व्यवस्थापकांना देण्यात आली. रेक्सिन कंपनीचे मुख्य कार्यालय लंडनमध्ये आहे. मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंग्लंड दौऱ्यावर असताना उद्योजक परिषदेत भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मालकांना आमंत्रित करण्यात आले. या परिषदेत उद्योग सुरक्षेबाबतचा मुद्दा चर्चिला जात असताना ‘रेक्सिन’च्या अध्यक्षांनी मुंबईशेजारील तळोजा, तसेच इतर अन्य कार्यालयांतील व्यवस्थापकांना गुंडांकरवी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पंतप्रधानांच्या कानी घातला. याच वेळी पोलीस याबाबत कसे हातावर हात ठेवून बसले आहेत, याची माहितीही कंपनी मालकांनी मोदींसमोर मांडली.
याची गंभीर दखल घेत मोदी यांनी मायदेशी परतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाला तसे निर्देश दिले आणि सखोल चौकशी करण्याच्या सूचना केल्या. यानंतर सूत्रे हलली. नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांना गृहमंत्रालयाकडून सुस्त पोलिसांवर तत्काळ कारवाई करा; अन्यथा बदलीस सामोरे जा, असा आदेश देण्यात आला. रंजन यांनी पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाद्वारे या साऱ्या प्रकरणाचा तपास केला. यात दीड वर्षांत कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुंडाकरवी कारवाई करण्यात आले. याउलट पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर असे प्रकार कंपनीत घडले नसते, असे स्पष्ट करण्यात आले आणि या प्रकरणी जबाबदार ठरलेल्या मोरे यांची अन्यत्र बदली करण्याची शिफारस करण्यात आली.

थानिक पोलीसांनी असहकार्य केल्यास थेट पोलीस उपायुक्त कार्यालयातही हे उद्योजक तक्रारी करूशकतील. तळोजातील वातावरण भयमुक्त आहे व राहील. स्थानिक कंत्राटदारांनी कंपनी व्यवस्थापनाशी तंटे करून कंत्राटे मिळविण्यापेक्षा उद्योजकांना हवी असलेली सेवा माफक दरात दिल्यास हे वाद होणार नाहीत. रेक्झीन कंपनीतील व्यवस्थापकांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार तडीपारीची कारवाई करण्याच्या विचारात आहे.
-विश्वास पांढरे, पोलिस उपायुक्त परिमंडळ

परिस्थिती तणावाचीच!
मोरे यांच्याजागी बुधवंत यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमधील संघर्ष विझलेला नाही. कंपनीच्या आवारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.