यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाचा कायापालट; शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर मार्गाची डागडुजी सुरू

सतरा वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी पालिकेची लगबग सुरू आहे. नेरुळ सेक्टर एकोणीस ए येथील यशवंतराव चव्हाण मैदानाचा कायापालट करण्यात आला आहे. सराव मैदानाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मैदानाबाहेरील कामालाही वेग आला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेची तयारी करण्यासाठी शेकडो हात कामाला लागले आहेत.

फुटबॉल सरावासाठी डॉ. डी. वाय. पाटील संकुलातील मुख्य स्टेडियमशेजारील युनिव्हर्सिटी मैदान, वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबचे मैदान व नेरुळमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण या तीन मैदानांची निवड करण्यात आली आहे. यापैकी नवी मुंबई स्पोर्टस क्लब मैदानाचे काम पूर्ण झाले आहे. यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाचे काम वाशीतील मैदानानंतर सुरू झाल्याने संबंधित ठेकेदाराला वेळेत काम पूर्ण करावे लागणार आहे. क्रीडांगणामध्ये लाल माती, त्यावरील लॉन फुटबॉलसाठी आवश्यक गोल पोस्ट व इतर सुविधा देण्यात येत आहेत.

६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान ही फुटबॉल स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत यजमान भारतासह इराण, इराक, जपान, उत्तर कोरिया, ब्राझील, पॅराग्वे, चीली, कोलंबिया, न्यूझीलंडसह विविध देश सहभागी होत आहे. यशवंतराव चव्हाण मैदानावरील प्रत्यक्ष खेळाच्या मैदानाचे काम पूर्ण होत आले असले, तरी मैदानाबाहेरील काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मैदानाबाहेर सपाटीकरण, सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू आहे.

स्पर्धेसाठी नेरुळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमची निवड झाली आहे. फुटबॉल खेळाडूंना सरावासाठी वाशी व नेरुळमधील मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाला सरावासाठी स्पर्धेला साजेसे देखणे रूप दिले आहे. मुख्य मैदानाचे काम पूर्ण झाले असून आता मैदानाबाहेरील कामेही लवकरात लवकर पूर्ण होईल.

– मोहन डगावकर, शहर अभियंत

१७ वर्षांखालील विश्वचषकामुळे नवी मुंबईचा नावलौकिक वाढणार आहे. स्पर्धेसाठी शहरात सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील.   

– सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई

राज्यस्तरीय समिती

या स्पर्धेसाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. समितीत अतिरिक्त पोलीस महासंचालक, नवी मुंबई पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, क्रीडा उपसचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, पोलीस उपायुक्त वाहतूक, आरोग्य विभागाचे संचालक, राज्य अग्निशमन दलाचे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालक, माहिती महासंचालक, आपत्ती व्यवस्थापन कमांडंट, क्रीडा उपसंचालक आहेत.

‘होस्ट सिटी लोगो’

सोमवारी मुख्यमंत्री व महापौरांच्या हस्ते ‘सिटी लोगो’चे अनावरण करण्यात आले. पहिला सामना ६ डिसेंबरला होणार असल्याने शीव-पनेवल तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. भिकाऱ्यांनी अडवलेल्या शहरातील उड्डाणपुलांखाली जागा रिकाम्या केल्या जात आहेत. वाहतूक बेटांचेही सुशोभीकरण सुरू आहे.