स्वच्छ सर्वेक्षणात देशात तिसऱ्या क्रमांकावर; राज्यातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर

गेली तीन वर्षे शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील पहिल्या दहा शहरांत स्थान पटकावणाऱ्या नवी मुंबईने यंदा सातव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. नवी मुंबई शहर हे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरले आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’मध्ये नवी मुंबईला हा बहुमान जाहीर झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या ऑनलाइन ‘स्वच्छ महोत्सव’ समारंभात केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली. मंत्रालयामधून महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्यचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री  प्राजक्त तनपुरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक व माजी प्रधान सचिव  मनीषा म्हैसकर तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक  अभिजीत बांगर, माजी आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ, अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे या ऑनलाइन समारंभात सहभागी झाले होते.

या मोहिमेत देशभरातील चार हजारांहून अधिक शहरांनी सहभाग घेतला होता. त्यातून नवी मुंबईने अव्वल स्थान पटकावले. या कामगिरीमुळे नवी मुंबईचे राष्ट्रीय स्तरावरील मानांकनही उंचावले आहे.

देशातील सहा शहरांमध्ये नवी मुंबईने ‘पंचतारांकित मानांकन’ पटकावले आहे. हा दर्जा प्राप्त करणारे नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांमध्ये नवी मुंबईला ‘ओडीएफ डबल प्लस रेंटिंग’ प्राप्त आहे. हागणदारीमुक्तीसाठी दोन वर्षे अभियान राबविण्यात आले.

स्वच्छनामा

* सुका आणि ओला कचरा घरातच वेगळा करून ‘आरएफआयडी’ या अत्याधुनिक वाहतुकीच्या माध्यमातून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रणाली राबविण्यात आली.

* तुर्भे एमआयडीसीतील येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात खत आणि इंधन निर्मिती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बांधकाम, तसेच पाडकामांतील  कचऱ्याच्या  विल्हेवाटीसाठी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले.

* रोज मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या गृहसंस्था, उद्योग, हॉटेले, उद्योगसमूहांच्या आवारातच ओल्या कचऱ्यापासून खत प्रकल्प सुरू केले. पालिकेच्या सर्व शाळा, तसेच उद्यानांमध्ये खत प्रकल्प सुरू करण्यात आले.

* शून्य कचरा झोपडपट्टीअंतर्गत राम नगर आणि दिघा या नवी मुंबईतील मोठय़ा झोपडपट्टय़ा कचरामुक्त करण्यात आल्या. जुनी कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून त्या ठिकाणी निसर्गोद्यान साकारण्यात आले.  शहरातील साफसफाईचे निरीक्षण आणि नियंत्रणासाठी राबविलेली ‘स्मार्ट वॉच’ संकल्पना उपयोगी ठरली.

सर्वेक्षण असे..

स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीव्दारे कोणतही पूर्वकल्पना न देता पालिका शहरातील स्थळांची  प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.   पाहणी दौऱ्यात नागरिकांशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. तसेच केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन मार्फत सुरू केलेल्या स्वच्छता अ‍ॅपवरही नागरिक प्रतिसादाची नोंद घेण्यात आली होती. तसेच स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय केंद्रातून कोणत्याही नागरिकास दूरध्वनी करून शहरातील स्वच्छतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे १९६९ या मोफत क्रमांकावर तसेच वेब पोर्टलवरूनही स्वच्छताविषयक प्रश्नावलीतून नवी मुंबईतील नागरिकांचे अभिप्राय जाणून घेण्यात आले होते.

नवीन संकल्पनेची राष्ट्रीय स्तरावर दखल 

*  सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने राबविण्यात येणाऱ्या कचऱ्यात टाकली जाणारी जुनी पादत्राणांचे संकलन करून त्याची दुरुस्तीची मोहीम सेवाभावी संस्थांमार्फत चालविण्यात आली. ‘ग्रीन सोल’ या अभिनव संकल्पनेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली.

* ‘प्लास्टिमॅन’ या संकल्पने अंतर्गत सॅशे, चॉकलेटची आवरणे, पिशव्यांचे तुकडे शाळांतील विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक बाटल्यांमध्ये संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या दोन्ही संकल्पना राष्ट्रीय स्तरावर प्रशंसनीय ठरली.

नवी मुंबई शहराला देशात स्वच्छतेत तिसरा बहुमान मिळला असून हे अभिमानास्पद आहे. हा राष्ट्रीय सन्मान स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित करीत आहोत. ही स्वच्छत चळवळ शहरातील प्रत्येक घटक, नागरिकांच्या सहभागाचे द्योतक आहे. यापुढे आता पहिल्या स्थानी येण्याचा मानस आहे.

-अभिजीत बांगर, पालिका आयुक्त