१३ वर्षांतील उच्चांक : दोन दिवसांत सरासरी ३२२ मी.मी पावसाची नोंद; सिडको, कोकण भवन,

टाटा नगरमध्ये सखल भागांत पाणी; पालिका, सिडको प्रशासनाची त्रेधातिरपीट

नवी मुंबई : मंगळवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सात तास संततधार कायम ठेवल्याने नवी मुंबईच्या नेरुळ व बेलापूर या भागात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाची मात्र या परतीच्या पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. सकाळी सात वाजता साफसफाईचे काम करण्यास येणाऱ्या कामगारांना पहाटे पाच वाजता बोलवून गटारांची झाकणे उघडण्यात आल्याने या भागातील पाण्याचा दहा वाजेपर्यंत निचरा होऊ शकला. या मुसळधार पावसाने सिडको, कोकण भवन, टाटा नगर हा नवी मुंबईतील वाणिज्य भाग सकाळी जलमय झाला होता.

नवी मुंबईतील पारसिक डोंगराच्या रांगांमुळे शहरात चार टप्प्यांत पाऊस कोसळत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली, वाशी, तुर्भे हा भाग ज्या वेळी जलमय होत असतो त्या वेळी नेरुळ, बेलापूर हा उंचावर असलेल्या भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र मंगळवारी रात्री पावणेबारा वाजता सुरू झालेला पाऊस सकाळी सात वाजेपर्यंत कोसळत होता. त्यामुळे बेलापूरमधील वाणिज्य भाग व सेक्टर दोन ते सहा या भाग जलमय झाला होता. हा संपूर्ण भाग समुद्रसपाटीपासून थोडा उंचावर असल्याने या भागात जुलै २००७ शिवाय पाणी साचल्याचे नोंद नाही. या भागात पडणारे पाणी हे खाडी भागाकडे सरकत असल्याने बेलापूरमधील कोकण भवन हा भाग वगळता पाणी साचत नाही. पण बुधवारी या भागात साचणाऱ्या पाण्याचे प्रमाण जास्त होते. या भागात २७१ मि.मी. पर्यंत सात तासांत पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे सीबीडीतील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते.

सर्वसाधारणपणे पहाटे सात वाजल्यापासून साफसफाई कामगार त्यांना नेमून देण्यात आलेल्या क्षेत्राची साफसफाई करतात मात्र संततधार पडणाऱ्या पावसामुळे या साफसफाई कामगारांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी पहाटे पाच वाजता कामाला बोलविले. त्यामुळे पाचशेपेक्षा जास्त साफसफाई कामगारांनी सकाळी सर्वात अगोदर पाण्याला जाण्यास वाव दिला. त्यासाठी गटारावर असलेली झाकणे उघडण्यात आली. त्यामुळे नंतरच्या तीन तासांत पाण्याचा निचरा होऊ शकला असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

कुठेही..कधीही पाणी साचू शकते..

नवी मुंबईत कुठेही पाणी साचू शकते, हे बुधवारच्या पावसामुळे स्पष्ट झाले. नवी मुंबईत सर्वसाधारण मुसळधार पावसात ऐरोली, आणि वाशी व तुर्भे या नोडमधील सकल भागात पाणी साचण्याची नोंद आहे. त्यामुळे या भागात अतिवृष्टीत पंप लावून पाणी काढले जाते. पावसाळ्यापूर्वी या भागातील कामे करून घेतली जातात. गटारांची साफसफाई केली जाते मात्र नेरुळ व बेलापूर हे नोड उत्तर नवी मुंबईपेक्षा उंच आहेत. त्यामुळे अपवाद वगळता या भागात पाणी साचत नाही. त्यामुळे पालिका प्रशासन गाफील होते. मात्र याच भागात अभूतपूर्व पाणी साचल्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे नवी मुंबईत कुठेही, कधीही पाणी साचू शकते हा धडा पालिका प्रशासनाला मिळाला आहे.