नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वासाचा ठराव १०४ मतांनी मंजूर झाला. त्यानंतर राजकीय आणि प्रशासनातील विरोधकांना एकत्र करण्यात नेते गुंतले असले आहेत. यासंदर्भात ‘लोकसत्ता महामुंबई’ने मंगळवारी नवी मुंबईकराचा ठराव काय असेल, याविषयी आवाहन केले. त्यावर बुधवारी ई-मेलच्या माध्यमातून लोकसत्तामध्ये प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. गुरुवारीही मुंढेना समर्थन देणाऱ्या प्रतिक्रिया अविरत येत होत्या. यातील काही निवडक प्रतिक्रियांना शुक्रवारच्या अंकात प्रसिद्धी देण्यात आली आहे. यातील काही प्रतिक्रिया..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या मूक संमतीने मंगळवारी नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मंजूर झालेला अविश्वासाचा ठराव दुर्दैवी आहे.

*  मंगेश वास्ते

मतदारांनी मिळून भ्रष्ट नगरसेवकांना सत्तेसाठी निवडून दिलेच की, मग त्यांच्यावर कोण अविश्वासाचा ठराव मांडणार? उलट एका कर्तव्यकठोर सनदी अधिकाऱ्याविरोधात अविश्वास ठराव आणायचा भ्रष्टांना अधिकारच काय?

* सूर्यकांत राजाराम जाधव

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कसं शांत आणि ‘राजकीय नियमां’नुसार वागावं, अशी राजकारण्यांची नेहमीच इच्छा असते. याविरोधात कोणी गेलं की मात्र त्यांची ‘रसद’ तुटते आणि ते ‘उपाशी’पोटी राहू शकत नाहीत. मुंढे यांच्यासारखा अधिकारी त्यांना नडतो तेव्हा ते कळपाने त्यांच्यावर हल्ला करतात. २१व्या शतकात हे घडलं, याचं दु:ख वाटतं.

* अभिजीत मोरे

निर्लज्ज पालिका सदस्यांकडून जनतेने अपेक्षा तरी काय ठेवायच्या? नवी मुंबई पालिकेच्या इतिहासातील मंगळवार हा काळा दिवस म्हणूनच सर्वाच्या लक्षात राहील. आपले असे लोकप्रतिनिधी आहेत, हे सांगायला लाज वाटते आहे.

* सागर लोखंडे

आयुक्त म्हणून मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून पालिकेत लोकांचं राज्य आलं असं वाटू लागलं होतं. लोकशाहीच्या माध्यमातून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना हे असं लोकांचं राज्य नको झालं. खरं तर हा मुंढेंचा पराभव नसून जनतेचा आहे. आगामी पालिका निवडणुकीत खरी कसोटी नागरिकांची आहे.

* प्रतीक अडसूळ, सानपाडा

महापौरांनी एवढय़ा तोऱ्यात पालिकेत पाऊल ठेवणार नाही, असे जे मध्यंतरी जाहीर केले, ते नेमके कशासाठी हे एकदा जाहीर करून टाकावे. नवी मुंबई पालिकेचा कारभार फारच चांगला चालला आहे. पालिकेतील एकही नगरसेवक भ्रष्ट नाही. सर्व धुतल्या तांदळासारखे आहेत, हेही दाखवून द्यावे.  महापौरांच्याच वॉर्डात किती बेकायदा झोपडय़ा वाढल्या आहेत, हे ते सांगावे नि मगच दुसऱ्यावर अविश्वास दाखवावा.

* बाळकृष्ण पाटील 

पालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांचेच अधिराज्य आमच्या हृदयावर आहे. त्यांनाच आमचा पािठबा आहे.

*  विशाल मनोळे

हा लोकशाहीचा खूनच आहे. तरीही मुंढे आम्हाला हवे आहेत. जर पैसे खाण्यासाठी नगरसेवक एक होऊ शकतात, तर तो रोखण्यासाठीही लोक रस्त्यावर उतरू शकतात.

* प्रतिभा मुळे

नगरसेवक तुमच्या कररूपी पैशांनाच हात घालणार असेल तर प्रत्येकाने जागे व्हायची वेळ आली आहे. कारण मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याने लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर नागरिकांनीही मुंढे यांना साथ द्यायला हवी. त्यासाठी शहराच्या विकासकामांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यायला हवा. प्रशासकीय कारभाराचा अनुभव असलेल्या व्यक्तींनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या बाजूने कौल द्यायला हवा. त्यासाठी अशा अनुभवी, ज्येष्ठ लोकांच्या समित्या ठिकठिकाणी निर्माण व्हायला हव्यात.

* पी. ए. पाथरे, नेरुळ

नवी मुंबईचे पालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे रुजू झाले. त्या क्षणी आम्ही समाधानी होतो. परंतु नवी मुंबईतच्या सत्तेवर बसलेल्या गुंडापुंडांनी येथील मतदारांची मंगळवारी लायकी दाखवून दिली. शरम त्यांना नाही, लोकांना वाटली पाहिजे, हेच त्यांनी ठरावातून सिद्ध केलं.

* अनिल तांडेल

प्रामाणिक अधिकाऱ्यांचे अभद्र युतीच्या माध्यमातून बळी जाणार असतील तर आता क्रांतिशिवाय तरणोपाय नाही. आगामी पालिका निवडणुकीत अशा भ्रष्टांना पराभवाचे पाणी पाजायला हवे. सुजाण मतदारांनी याचा विचार करावा.

* गौतम पाटोळे 

कायद्याला बांधील राहून जर एखादा अधिकारी लोककल्याणासाठी कारभार चालवत असेल तर पालिकेत मंगळवारी मंजूर झालेला अविश्वासाचा ठराव म्हणजे केवळ तमाशा आहे. सर्व नवी मुंबईकरांनी मुंढे यांच्यावरच दृढ विश्वास दाखवायला हवा.

* नूपुरा देशपांडे

नगरसेवक आणि त्यांच्या नेत्यांना अडवणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची हीच गत होणार आहे. त्यामुळे पालिकेत पुन्हा असेच नगरसेवक येणार असतील तर मग पुन्हा नवी मुंबई भ्रष्टाचाराच्या खाईत लोटली जाणार आहे, यात तिळमात्र शंका नाही.

* सर्जेश गटे

तुकाराम मुंढे हे २१व्या शतकातील नवी मुंबई शहराचे प्रतीक होते, असे मला म्हणवणार नाही, कारण असा सच्चा अधिकारी या शहराचा चेहरा अजूनही आहे.

* नरेश गायकवाड, वाशी

राष्ट्रीय संपत्तीचा स्वत:साठी वापर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो. खरे तर हे आपल्या लोकशाहीचे अपयश आहे. प्रामाणिक अधिकाऱ्याविरोधात संपूर्ण राजकीय ताकद लावणाऱ्यांना आता जनताच धडा शिकवू शकते.

* महादप्पा गोंडा

रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई  महापालिकेत आयुक्तांवरील अविश्वास ठराव मंजूर झाला, पण आता या शहरातील बेकायदा बांधकामांवरील कारवाई, पालिकेतील बेशिस्तीचे काय? की पुन्हा येरे माझ्या मागल्या. काही महिन्यांपूर्वी  ठाण्याच्या कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर आणि प्रामाणिक अधिकारी अशा डॉ. अश्विनी जोशी यांची तडकाफडकी  बदली करण्यात आली.  अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या बदल्या करून सरकार जनतेला कोणता संदेश देत आहे?

* विवेक तवटे, कळवा.

नगरसेवकांना आता पालिकेत रान मोकळे मिळाले आहे. आता कसे सारे आलबेल होईल. ते यापुढे नागरिकांसाठी विकासकामे हाती घेतील आणि त्यांचा विकास करवून घेतील. मुख्यमंत्र्यांनी या साऱ्या परिस्थितीचा जरूर विचार करावा आणि नगरसेवकांचीच मागणी मान्य करावी. त्याचवेळी नवीन आयुक्तांची नेमणूक करताना मुख्यमंत्र्यांनी सर्व ‘सन्माननीय’ पालिका सदस्यांना विश्वासात घेऊन वा त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून मगच नवा आयुक्त नियुक्त करावा. म्हणजे येत्या काळात पुन्हा अविश्वास ठराव मांडण्यासाठी नगरसेवकांना कष्ट पडणार नाहीत. नाही तरी मुख्यमंत्र्यांना नवी मुंबईला स्मार्ट सिटी बनवायचेच आहे. त्या कामी हे नगरसेवक येतीलच.

* रवींद्र भागवत, सानपाडा

नवी मुंबईकरांची मान मंगळवारी शरमेने मान खाली गेली. मुंढे यांच्यासारखा अधिकारी आम्ही टिकवू शकलो नाही, याचं अतीव दु:ख वाटतं आहे. भ्रष्ट राजकारणी आणि काही स्वार्थी नागरिकांची अभद्र युती पाहून आम्हाला आता भीती वाटू लागली आहे.

* किशोर नायक, वाशी

आयुक्त मुंढे यांनी भारतीय राज्यघटनेचे संरक्षण केले आहे. त्याची शिक्षा १०४ नगरसेवकांनी त्यांच्यावर अविश्वास दाखवून करावी, हे न समजण्यापलीकडचे आहे. म्हणूनच सध्या पालिकेत असलेल्या १०४ नगरसेवकांना पुन्हा निवडून देऊ नका. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंढे यांच्या मागे उभे राहतीलच!

* संकेत शिंदे