पालिका, सार्वजनिक बांधकामचा दावा फोल

नवी मुंबई गेले आठ दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई शहरातील अंतर्गत रस्त्यांसह शीव-पनवेल महामार्गावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. काँक्रिटीकरण झालेल्या ठिकाणी खड्डे पडणार नाहीत असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने तर अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे दर्शन होणार नाही असा दावा पालिकेने केला होता, मात्र तो फोल ठरला आहे.

पावसामुळे दुरुस्ती करता येत नसल्याने पाऊस कमी होताच खड्डे दुरुस्ती केली जाईल अशी माहिती शहर अभियंता विभागाकडून देण्यात आली.  गेल्या वर्षी शीव-पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे पनवेल ते वाशी या काही मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते दोन तास लागत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी या मार्गावरील डांबरीकरणाच्या ठिकाणी काँक्रिटीकरणाच्ी कामे केली आहेत. त्यामुळे खड्डे पडणार नाहीत असा दावा त्यांनी केला होता. मात्र तुर्भे, सानपाडा, उरण फाटा उड्डाणपूल परिसरात खड्डे पडलेले आहेत.

त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रात पालिका मुख्यालयाबाहेरील आम्रमार्गावर खड्डे पडले आहेत. सानपाडा भुयारी मार्गाच्या प्रवेशमार्गावरच मोठे खड्डे आहेत. वाशी अग्निशमन केंद्राजवळील चौक, डायमंड हॉटेल, तसेच ऐरोली टी जंक्शन येथील रस्ते खड्डय़ात गेले आहेत.  पावसाळ्याआधीही रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. त्यामुळे पडलेले खड्डे पालिकेने तात्काळ बुजवावेत अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

शहरात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. परंतु पावसामुळे खड्डे बुजवताना अडचणी येत आहेत. पावसाचा जोर ओसरला की तात्काळ देखभाल दुरुस्तीचे वार्षिक काम दिलेल्या ठेकेदारांकडून विभागनिहाय खड्डेदुरुस्ती करण्यात येईल.

– सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, नवी मुबंई महानगरपालिका