18 November 2017

News Flash

पाटय़ांचा मोह सुटेना

लोकप्रतिनिधींना केवळ महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधींच्या वाहनांसाठी असणारा स्टिकर लावण्याची मुभा आहे.

शरद वागदरे, नवी मुंबई | Updated: September 9, 2017 2:14 AM

विषय समिती सभापती, उपसभापतींच्या खासगी वाहनांवर पदांच्या नियमबाह्य़ पाटय़ा

सभापती विधि समिती, सभापती आरोग्य समिती, उपसभापती समाजकल्याण समिती.. नवी मुंबईत अशा पाटय़ा लावलेली वाहने सर्रास दिसतात. राज्यात मुख्यमंत्र्यांसह अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी लाल दिवा वापरणेही बंद केले असताना नवी मुंबई महापालिकेतील विविध विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतींचा वाहनांवर बिरुदावली मिरवण्याचा मोह सुटलेला नाही. अशा पाटय़ा लावण्यासंदर्भात महापालिका अधिनियमात कोणतीही तरतूद नाही. आरटीओ आणि वाहतूक विभागाचे नियम धाब्यावर बसवून या पाटय़ा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्याचा इशारा या दोन्ही विभागांनी दिला आहे.

महानगरपालिकेच्या आठ विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतींची दोन महिन्यांपूर्वी निवड करण्यात आली. त्यापैकी बहुतेकांनी आपल्या खासगी वाहनांच्या मागे-पुढे पदाची पाटी डकवली. त्यात राष्ट्रवादीचे सभापती व उपसभापती आघाडीवर आहेत. लोकप्रतिनिधींना केवळ महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधींच्या वाहनांसाठी असणारा स्टिकर लावण्याची मुभा आहे. तर पालिका अधिनियमानुसार महापालिकेचे अधिकारी, आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते व प्रभाग समिती अध्यक्ष यांनाच वाहनांवर पाटी लावण्याची मुभा आहे. मात्र विषय समित्यांचे सभापती, उपसभापती प्रसिद्धीच्या मोहात पडून खासगी वाहनांवर पदांच्या पाटय़ा लावत आहेत.

नगरसेविकांचे प्रसिद्धीलोलुप पती

महिला आरक्षणामुळे नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला आहेत. त्यापैकी बहुतेक नगरसेविकांचे पतीच कारभार सांभाळत आहेत. अशा नगरसेविकांचे पतीही त्यांच्या वाहनांवर नगरसेवकपदाचा स्टिकर लावून स्वत:च नगरसेवक असल्याच्या थाटात वावरताना दिसतात.

लवकरच कारवाई करू

नियमबाह्य़ पाटय़ा उभारणाऱ्यांवर आरटीओकडून कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमावलीनुसार आढावा घेऊन अशा प्रकारे खासगी वाहनांवर पाटय़ा उभारणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाटय़ा हटवण्याचे निर्देश देण्यात येतील. महापालिका नियमावलीच्या आधारे व प्रादेशिक वाहन नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

महापालिका परिशिष्ट नियमावलीनुसार आयुक्तपदासह अन्य महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना पाटय़ा लावण्याचा अधिकार आहे. विशेष समितीच्या सभापती व उपसभापतींना अशा प्रकारे पाटय़ा लावण्याचे अधिकार आहेत का, याची तपासणी करून नियमबाह्य़ पाटय़ा लावणाऱ्या लोकप्रतिनिधींवर योग्य कारवाई करण्यात येईल.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

पालिकेतील पदाचा उल्लेख असलेल्या पाटय़ा खासगी वाहनांवर लावून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहनला आहे. पदाधिकारी त्यांच्या वाहनांवर बेकायदा पाटय़ा लावून फिरत असल्याचे आढळल्यस कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना देण्यात येईल.

डॉ. सुधाकर पाठारे, नवी मुंबई पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१

वाहनांवर बेकायदा पाटय़ा लावून फिरणाऱ्या नगरसेवक किंवा विविध समितींच्या सभापती व उपसभापतींवर कारवाई करणे ही, आरटीओची जबाबदारी आहे. कायद्यानुसार ज्या पदासाठी शासनाकडून वाहन देण्यात येते, त्याच वाहनांवर पाटय़ा लावण्याची परवानगी आहे, मात्र खासगी वाहनांवर पदाच्या पाटय़ा लावून फिरणे हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. अशी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात येतील.

 – नितीन पवार, पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, नवी मुंबई

First Published on September 9, 2017 2:14 am

Web Title: navi mumbai rto nmmc vehicle nameplate