12 July 2020

News Flash

एकल मातेच्या मुलाला शाळा प्रवेशास नकार

या संदर्भात शाळा प्रशासनाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता कुणीही बोलण्यास नकार दिला.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुख्याध्यापिकेची मनमानी; केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून दखल

नवी मुंबई : नवी मुंबईतील एका शाळेने सिंगल पॅरेंट (एकल माता) असल्याच्या कारणाने एका महिलेच्या मुलास प्रवेश नाकारल्याचा प्रकार घडला आहे. पालक आणि शाळेच्या मुख्याध्यापिकेतील संवादाची चित्रफित समाजमाध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.

जुईनगर येथे राहणाऱ्या सुजाता मोहिते पतीपासून वेगळ्या राहत असून मुलगा त्यांच्याकडेच असतो. त्या वाशी येथील सेंट लॉरेन्स या शाळेत आपल्या सात वर्षांच्या मुलाला प्रवेशासाठी प्रयत्न करीत होत्या. त्यांनी शाळेशी संपर्क केला असता, प्रवेश पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी शाळेशी ओळख असणाऱ्या व्यक्तीसमवेत शाळेत मुख्याध्यापक सायरा केंडे यांना भेटण्यासाठी गेल्या. त्या वेळी त्यांना मुख्याध्यापकांनी सिंगल पॅरेंटच्या पाल्यांना प्रवेश देत नसल्याचे सांगितले. याचे कारण विचारले असता, मुले अभ्यास पेलू शकत नाहीत, असे उत्तर दिले. प्रवेश घेतल्यावर पॅरेंट सिंगल झाला तर? असे विचारल्यावर त्याला नाइलाज असल्याचे उत्तर मुख्याध्यापिकेने दिले.

ज्यांच्या ओळखीने सुजाता या पुन्हा शाळेत गेल्या होत्या, त्यांनी प्रवेश निश्चित होईल, ‘तुम्ही दाखला काढून आणा व फी भरून टाका’ असा निरोप मोहिते यांना दिल्याने त्यांनी याबाबत मुख्याध्यापिकेशी बोलल्यावर, मी दाखला काढण्यास सांगितला का? असे सुनावले. या संवादाची चित्रफीत सामाजमाध्यमावर पालक सुजाता मोहिते यांनी टाकल्यानंतर ती चित्रफीत टाकली आहे.

या संदर्भात शाळा प्रशासनाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता कुणीही बोलण्यास नकार दिला. नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण अधिकारी संदीप सांगवे यांनी, सिंगल पॅरेंटच्या पाल्याला प्रवेश नाकारणे हे नियमबाह्य आहे. याबाबत आम्ही शाळेशी संपर्क करून समज दिली असल्याचे सांगितले.

 

सेंट लॉरेन्स शाळेत मुलाच्या दुसरी वर्गाच्या प्रवेशासाठी गेले असता सिंगल पॅरेंटच्या पाल्यांना प्रवेश दिला जात नसल्याचे ऐकून मला धक्काच बसला. याबाबत मी शिक्षण विभागाकडे तक्रार करणार आहे. त्या शाळेत माझ्या मुलाला प्रवेश नकोच. मी अन्य शाळेत मुलाला प्रवेश घेतला आहे.

-सुजाता मोहिते, पालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2019 12:45 am

Web Title: navi mumbai school denies admission to child of single mother
Next Stories
1 शहरबात : बेकायदा बांधकामांना अभय
2 ‘मॅफको’ अतिधोकादायक
3 ऐरोली उन्नत मार्गाला हिरवा कंदील
Just Now!
X