|| पूनम धनावडे

शाळा व्यवस्थापन, पालक नाराज;  शिक्षण मंडळाचे मात्र कानावर हात

पालिका शाळेतील शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील शासनाच्या प्रत्यक्ष लाभार्थी योजनेअंतर्गत शालेय वस्तूंचे पैसे थेट खात्यात जमा करण्याच्या सुरू असलेल्या योजनेची बहुतांश देयके अद्याप शाळांमध्ये पोचलीच नाहीत, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी मात्र एकही देयक प्रलंबित नसल्याचा दावा करीत आहेत. मग ही रक्कम गेली कुठे? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे.

सर्वशिक्षा मोहिमेचा सर्वत्र प्रसार होऊन प्रत्येक मुलाने साक्षर व्हावे, यासाठी विविध प्रोत्साहनात्मक योजना शासनाकडून राबविल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या पातळीवर प्रशासकीय उदासीनता असल्याने विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे दिसून येत आहे.  गेल्यावर्षीचे पैसे खात्यात वर्ग झाले नसल्याने यंदा बहुतेक पालकांनी नवीन गणवेश घेण्याचे टाळले आहे.

गेल्या वर्षांपासून प्रत्यक्ष लाभार्थी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी आधी स्वखर्चाने शालेय साहित्य खरेदी करून त्याची वस्तू व सेवा करासहित असलेली पावती शाळेत जमा करायची आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या वस्तू खरेदीची रक्कम खात्यात वर्ग करण्यात येईल अशी योजना होती. त्यानुसार ऐपतीप्रमाणे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचे शालेय साहित्य खरेदी करून त्या रकमेची पावती शाळा प्रशासनाकडे दिली आहे. शाळा प्रशासनानेही सर्व विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे सुपूर्द केलेली आहे. मात्र वर्षांनंतरही पैसे खात्यात जमा झालेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. शिक्षण अधिकारी मात्र ही वस्तुस्थिती नाकारीत आहेत.

प्रति विद्यार्थी तीन ते चार हजार रुपये खर्च

या योजनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांपोटी तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आठ प्रकारचे शैक्षणिक साहित्य दिले जाते. त्यात शालेय गणवेश, पी.टी. गणवेश, स्काऊट गाइड गणवेश, बूट, वह्य़ा, पुस्तके, दप्तर, रेनकोटचा समावेश आहे.

गेल्यावर्षी सर्व विद्यार्थ्यांचे देयक दिले आहे. तरीही काही विद्यार्थी राहिले असतील तर त्याची माहिती द्या. त्याचा पाठपुरावा करून रक्कम दिली जाईल.    – संदीप सांगवे,  शिक्षण अधिकारी

गेल्या वर्षीच्या देयकाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. एका विद्यार्थ्यांला साधारण ३ ते ४ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे यंदा नवीन गणवेशच घेतले नाहीत.   – दैवीशाला सोनकांबळे, पालक