पोलीस ठाण्यांचे पद पुरुष अधिकाऱ्यांकडे 

महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘ती’चे खच्चीकरण

नवी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना व्यवस्थितपणे ‘साइडपोस्टिंग’ देऊन त्यांना पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पदावरून दूर ठेवण्यात आले. काहींची सेवाज्येष्ठतेला बगल देऊन त्यांच्या कनिष्ठांना पोलीस ठाण्यांची बहाली करण्यात आली. या सर्व बदल्या नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी पदभार सोडण्यापूर्वी केल्या होत्या. त्यामुळे शिस्तीच्या व स्त्रियांना समान वागणूक देणाऱ्या या खात्यामध्ये ‘ती’चे खच्चीकरण झाल्याची चर्चा आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या हेमंत नगराळे यांनी या स्त्री खच्चीकरणाविषयी भूमिका स्पष्ट करताना सदरच्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल आणि त्यांच्या अनुभवाचा योग्य त्या तपासात मदत घेऊ, असे आश्वासन आज पत्रकार परिषदेत दिले.

नवी मुंबईतील अनेक महिला अधिकाऱ्यांना मदतनीसांची कमतरता असतानाही एकटीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलीस ठाणे व्यवस्थितपणे चालविले. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने लहानग्या मुलींच्या मानवी तस्करीचे प्रकरण परराज्यात उघड केले. लुटीतील काही किलो सोने जप्त करून नवी मुंबई पोलिसांची लाज राखली. अशा महिला पोलिसांना त्यांचा कार्यकाळ संपताच आयुक्त रंजन यांनी  थेट कर्तव्य नसणाऱ्या जागी रवाना केले आहे. यामुळे इतर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईत तत्कालीन पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद असताना ही ताईगिरी सुरू झाली. त्यानंतर या ताईगिरीने चांगल्या पद्धतीने पोलीस ठाणे चालविले. त्यामुळे हा ताईगिरीचा पायंडा पडला. मात्र आयुक्त रंजन यांनी पदोन्नती घेताना पुरुषगिरीचा पायंडा रचल्याने नवी मुंबईतील ताईगिरी बंद झाल्याची चर्चा आहे. बुधवारी नवीन पोलीस आयुक्त नगराळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या महिलांचे खच्चीकरण होऊ देणार नाही उलट या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृ ष्ट सेवेमुळे त्यांच्या अनुभवाचा लाभ इतर तपासासाठी करू असे जाहीर केले. मात्र या महिला अधिकाऱ्यांना पुन्हा नव्याने पोलीस ठाणे देण्याविषयी आयुक्त नगराळे स्पष्ट काही बोलले नाहीत.