नवी मुंबई पालिका सभागृहातील राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपातील सात नगरसेवकांच्या डोक्यावर बेकायदेशीर बांधकामामुळे अपात्रतेची टांगती तलवार लटकत असून येत्या महिना अखेर राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांना घरी बसावे लागणार आहे. यानंतर बेकायदेशीर बांधकामात सहभाग असणाऱ्या शिवसेनेच्या तीन नगरसेवकांना नारळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या महापौर निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा युतीने गुडघ्याला बाशिंग बांधले असून मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

नवी मुंबई पालिकेची पाचवी सर्वात्रिक निवडणूक गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पार पडली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने अपक्ष व काँग्रेसच्या मदतीने या पक्षाने पालिका काबीज केली आहे. दिघा येथील ९९ बेकायदेशीर बांधकामात तेथील नगरसेवक अनिल गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. पालिका आयुक्त मुंढे यांच्याकडे त्यांची सुनावणी नुकतीच पार पडली असून तुकाराम मुंढे यांची कार्यशैली पाहता हे नगरसेवक अपात्र ठरण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर आयुक्तांच्या या निर्णयाला हे अपात्र नगरसेवक मुंबई उच्च न्यायालयात आव्हाण देऊ शकणार आहेत. या तीन नगरसेवकांच्या अपात्र बरोबरच शिवसेनेचे ऐरोलीतील तीन नगरसेवक अपात्रतेच्या रडारवर आहेत. यातील दोन नगरसेवकांचा बेकायदेशीर बांधकामात थेट सहभाग आढलून आला आहे. भाजपचा नेरुळ येथील एक नगरसेवक या बेकायदेशीर बांधकामात अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात असून पालिकेतील सात नगरसेवक येत्या वर्षभरात अपात्र ठरण्याची भिती राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर एक नगरसेविका अपात्र व एक नगरसेविकेच्या आकस्मिक निधनामुळे पोटनिवडणूका झालेल्या आहेत. त्यातील दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला असून आपल्या जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. त्यामुळे येत्या काळात अपात्र ठरणाऱ्या नगरसेवकांच्या जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणूकीत वर्चस्व ठरणारा पक्ष पुढील महापौर निवडणूकीची व्यहूरचना आखत आहे. यात शिवसेनेने रविद्र फाटक यांच्यामुळे विधानपरिषद जिंकल्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास वाढला आहे.