भिकारी, गर्दुल्ल्यांचा मुक्काम; नागरिकांची सुरक्षा धोक्यात, पालिका व पोलिसांचे दुर्लक्ष

नवी मुंबईतील पादचाऱ्यासाठी बांधलेले स्कायवॉकवर सध्या घाणीचे साम्राज्य आहे. भिकारी येथे सध्या वस्तीला आहेत. याशिवाय गर्दुल्ल्यांमुळे येथील सुरक्षा धोक्यात आली आहे. शहरातील काही स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे. त्यामुळे यावरून लोकांचे चालणे जवळपास अशक्य होऊन बसले आहे. याच स्कायवॉकवर काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे, यावर विश्वास बसणेही कठीण आहे.

नवी मुंबईत सिडको आणि पालिका यांनी मिळून स्कायवॉक बांधले आहेत. काही वर्षांपूर्वी जुईनगर रेल्वे स्थानकासमोर भव्य स्कायवॉक बांधण्यात आला. पर्यटकांसाठी तो आकर्षण ठरला होता.

सध्या या स्कायवॉकवर शरीरविक्रय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांचा वावर असतो. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप पादचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील महिला कर्मचारी सायंकाळनंतर स्कायवॉकवरून जाणे टाळतात.

तुभ्रे नाक्यावर स्कायवॉक बांधण्यात आला. त्यावर सध्या भिकारी आणि गर्दुल्ल्यांचा मुक्काम आहे. स्कायवॉकवर सर्वत्र पान, मावा आणि गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारून तो रंगवून ठेवला आहे. जागोजागी कचरा पडल्याने सर्वत्र दरुगधीचे साम्राज्य आहे. या स्कायवॉकची रुंदी वाढविण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.

खरणे येथील स्कायवॉकचे मोठा गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आले होते. आजमितीला स्कायवॉकचे छप्पर उडालेले आहे. पालिका अभियंत्यांनी त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे.

रबाळे येथील स्कायवॉकच्या उद्घाटनावरून राजकारण चांगलेच रंगले होते. सध्या या स्कायवॉकचा वापर नेटिझन करतात. कॉल सेंटरमधील कर्मचारी या स्कायवॉकचा लाभ उठवतात. या स्कायवॉकला उद्वाहन आहे. ते सध्या बंद आहे.

त्यामुळे नागरिकांना जिने चढावे लागत आहेत. महापे येथील ‘मिलेनियम बिझनेस पार्क आणि एमआयडीसीतील कार्यालयातील कर्मचारी महापे येथील पादचारी पुलाचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. पादचारी पुलावर रात्रीच्या वेळी गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. कंपनीतील कर्मचारी हे रहदारीच्या वेळी लाल दिवा लागल्यांनतर जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत असतात.

ऐरोली नाक्यावर चिंचपाडा आणि ऐरोली येथील पादचारी पुलांवरही गर्दुल्ले आणि टवाळखोरांचा वावर असतो. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून महिला रेल्वे रूळ ओलांडत असतात.

पावणे कोपरी पादचारी पुलावर नागरिकांना लुटण्याचे प्रकार करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री ९.३० नंतर नागरिक जाणे टाळतात. ऐरोली स्थानकाजवळ एमआयडीसीने पादचारी पूल बांधला आहे. त्याचाही वापर करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी गर्दुल्ल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पावणे- कोपरी पादचारी पुलावर भरपूर वेळा लुटमार होण्याचे प्रकार झाले आहेत. या ठिकाणी गर्दुल्ले लूटमार करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी पादचारी पुलावर न जाता खरणे येथील सिलिकॉन बसथांब्यावर रस्ता ओलांडून कोपरीकडे यावे लागते.

सुहास पानवल, नागरिक

तुभ्रे येथे असणाऱ्या स्कायवॉकवर भिकारी, गर्दुल्ले आणि फेरीवाल्यांचा वावर मोठय़ा प्रमाणावर असतो. त्याची रुं दी वाढविण्याची गरज आहे.

चाँद शेख, नागरिक