सिडकोमध्ये आज पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ; राष्ट्रवादी काँग्रेसकडून भीती व्यक्त

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्यात बाद झालेल्या नवी मुंबईचा स्मार्ट प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पुन्हा येणार असून सत्ताधारी पक्षामुळे कसे बाद झालो याची कहाणी नगरसेवक मांडणार आहेत. हा प्रस्ताव महासभेत मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविण्याच्या दृष्टीने जानेवारीच्या सभेत मांडण्यात आला होता पण ही सभा तहकूब ठेवल्यामुळे त्यावर मंगळवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. याच दिवशी डिसेंबर मधील तहकूब सभा पूर्ण करण्याचे सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत एक विशेष हेतू कंपनीचा शिरकाव होणार असल्याने नगरसेवकांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसवेकांनी नोव्हेंबर महिन्याच्या सभेत मांडली. त्यामुळे हा बहुमताच्या बळावर प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्याची राज्यात फार मोठी चर्चा झाल्याने पालिकेतील शिवसेना व भाजपा या दोन पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रस्ताव विशेषधिकाराचा वापर करुन केंद्र सरकारकडे पाठविण्याची गळ घालण्यात आली. तसा आदेश मुख्यमंत्र्यानी आयुक्त दिनेश वाघमारे यांना दिल्याने त्यांनी ऑनलाईन हा प्रस्ताव सादर केला. असे असताना पहिल्या टप्यातील वीस शहराच्या पहिल्या यादीत नवी मुंबईचे नाव कापण्यात आले असून सर्वसाधारण सभेची मंजूरी नसल्याने वीस गुण देण्यात आले नाहीत असे कारण स्पष्ट करण्यात आले आहेत. नवी मुंबई पालिकेला इतर सुविद्या आणि उपाययोजनांमुळे ५२ गुण मिळाले असून सर्वसाधारण सभेच्या मंजूरीमुळे तील गुणांची भर पडली असती अशी चर्चा आहे. त्यामुळे ८२ गुण मिळवून नवी मुंबई ही देशातील पहिले शहर या ठरले असते असे आराखडे मांडले जात आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नार्केतपणामुळे नवी मुंबई स्मार्ट सिटी उपक्रमातून बाद झाली अशी टिका मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत विरोधक करणार आहेत मात्र मुख्यमंत्र्यांनी विशेषधिकाराचा वापर करुन ऑनलाईन हा प्रस्ताव सादर केला त्याचे काय झाले याचे उत्तर मात्र विरोधक देऊ शकणार नाहीत असे दिसून येते. स्मार्ट सिटीच्या या स्पर्धेतील पहिल्या टप्यात नवी मुंबई बाद झाली असून पुढील टप्यात तरी निदान वर्णी लागावी यासाठी मंगळवारी हा प्रस्ताव काही अटी व शर्ती घालून मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या या प्रस्तावावरुन मंगळवारी स्मार्ट चर्चा होणार आहे.

मंगळवारी होणाऱ्या या सभेत स्मार्ट सिटीच्या या प्रस्तावाबरोबरच तुर्भे येथील क्षेपणभूमीवर विद्युत प्रकल्प उभारणीसाठी १८० कोटी रुपये खर्च करण्याचा एक प्रस्ताव सादर केला जाणार असून त्यावर गोंधळ होणार आहे. याशिवाव ठाणे येथील आखिल भारतीय नाटय़ संमेलनासाठी दहा लाख रुपये आर्थिक सहकार्य करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असून तो मंजूर होण्याची शक्यता आहे. संमेलनासाठी ठाणे जिल्यातील सर्व पालिका व नगरपालिकांकडे आर्थिक सहकार्य मागण्यात आले आहे.