News Flash

फुटबॉल सरावात सिडकोचा खो

वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएनचे (एनएमएसए) क्रीडा संकुल प्रतिष्ठेचे मानले जाते.

‘क्रीडा संघटने’चे सदस्यत्व कर्मचाऱ्यांना सवलतीत मिळावे यासाठी अडवणूक

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या १९वर्षांखालील जागतिक ‘फिफा’ फुटबॉल स्पर्धेसाठी मैदान देताना सिडकोने खोडा घातल्याचे समजते. ‘नवी मुंबई स्पोर्टस असोशिएशन’च्या वतीने हे आंतरराष्ट्रीय फुटबॉल सराव मैदान बनविले जात आहे. त्यासाठी सिडकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. सिडकोचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना सवलतीच्या दरात असोसिएशनचे सदस्यत्व दिले तरच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी अट घालत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खो घालण्याचा प्रयत्न सिडकोने सुरू केला आहे.

वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएनचे (एनएमएसए) क्रीडा संकुल प्रतिष्ठेचे मानले जाते. त्याचे सदस्यत्व मिळावे यासाठी अनेकांचा प्रयत्न सुरू आहे. सिडकोने या क्लबला २० वर्षांपूर्वी सवलतीच्या दरात भूखंड दिला आहे. त्याबदल्यात सिडकोच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सवलतीच्या दरात सदस्यत्व देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्याला असोशिएशनच्या सर्वसाधारण सभेत विरोध करण्यात आला आहे. अशा प्रकारे सवलतीच्या दरात सदस्यत्व (कमीत कमी ५० हजारात ) देणे सुरू केल्यास ज्यांच्या जमिनीवर हे शहर उभारले गेले आहे, त्या प्रकल्पग्रस्तांनाही सवलत द्यावी लागेल, असा मुद्दा या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे सिडकोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात सदस्यत्व नाकारण्यात आले आहे.

ऑक्टोबरमध्ये नवी मुंबईत १९ वर्षांखालील खेळाडूंच्या जागतिक फुटबॉल स्पर्धा होत आहेत. त्यातील काही सामने नेरुळ येथील डी. वाय. पाटील मैदानात खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेमुळे नवी मुंबईचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचून शहराला महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या सरावासाठी पालिका व एनएमएसए दोन मैदाने तयार करत आहे.

स्पर्धेला केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून सहकार्य केले जात आहे. नुकतीच क्रीडा मंत्र्यांनी या सराव मैदानांची पाहणी केली.

पालिकेचे मैदान नेरुळ येथे तयार होत असून वाशी येथील एनएमएसएच्या मागील बाजूस असलेल्या पाच एकरांवरील मैदानात दुसरे सराव मैदान तयार केले जात आहे. या सामन्यांसाठी मैदानात काही विशेष सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. त्यासाठी नगरनियोजनाला जबाबदार प्राधिकरण म्हणून पालिकेची संमती असणे आवश्यक आहे. पालिकेकडे ती मागण्यात आल्यानंतर पालिकेने सिडकोची एनओसी मागितली आहे. सिडकोकडे एनओसी देताना कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सवलतीतील सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.  सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

मैदानांत विशेष सुविधा

ही मैदाने फिफा चमूच्या मार्गदर्शनाखाली तयार केली जात आहेत. त्यामुळे ती सर्वसाधारण मैदानांसारखी नसून त्यासाठी खास गवत, वाळू आणि पाणी वापरले जाणार आहे. या मैदानांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचा एक हौद बांधावा लागणार आहे. ज्याची पाणी साठवण्याची क्षमता ३५ हजार लिटर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2017 1:08 am

Web Title: navi mumbai sports association football ground sidcco
Next Stories
1 ‘शीव-पनवेल’वरील खड्डय़ांमुळे वाहतूक पोलीस त्रस्त
2 जुलै अखेपर्यंत शालेय साहित्य पुरवा
3 कुटुंबसंकुल : निरोगी वातावरणातील रहिवासी
Just Now!
X