राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला असून यामध्ये नवी मुंबईतील मुलींनी बाजी मारली आहे. नवी मुंबईचा निकाल ८९.१८ टक्के लागला असून मुली ८७.१९ टक्के व मुले ८६.८८ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून १३७ शाळांतून १५ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यामधून ८४५७ विद्यार्थी व ६९७० विद्यार्थिनी परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी ७३४८ मुले व ६४०७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
एकूण पालिका क्षेत्रातील ३९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या निकालांची मूळ गुणपत्रिका १५ जून रोजी सकाळी ११ वाजता शाळांना व दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
उरणचा निकाल ९० टक्के
मार्च २०१६च्या दहावीचा निकाल जाहीर झाला असून उरण तालुक्यातील चोवीस विद्यालयांतून २२४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २ हजार ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे उरण तालुक्याचा सरासरी निकाल ९०.७५ टक्के इतका लागला आहे.
यामध्ये तालुक्यातील सहा विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मागील वर्षांपेक्षा दोन शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर नेहमीप्रमाणे उरण तालुक्यातही या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.