नवी मुंबई पालिकेच्या शाळेत संगणक प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या एकाने १४ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
लोचन परुळेकर आरोपीचे नाव आहे. एका विश्वस्त संस्थेच्या वतीने लोचन याला पालिका शाळेत प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले होते. संगणक प्रशिक्षणादरम्यान तो विद्यार्थिनींना लज्जा उत्पन्न होईल, अशा पद्धतीने स्पर्श करीत होता. असे प्रकार तो गेले दोन महिने करीत होता.
शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त काही विद्यार्थिनींना त्याने वर्गात अनेकदा बोलावले होते. काही दिवसांपूर्वी शाळेची सहल गेल्याने शाळा बंद होती. मात्र काही विद्यार्थिनी सहलीला गेल्या नव्हत्या. काही विद्यार्थिनींना शाळा बंद असतानाही त्याने त्या दिवशी वर्गात बोलावले होते. ही बाब शाळेतील एका शिपायाला खटकल्याने त्याने हा प्रकार शिक्षकांच्या कानावर घातला. त्यानंतर शाळेतील महिला शिक्षकांनी विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार कथन केला.
‘वात्सल्य ट्रस्ट’च्या वतीने प्रशिक्षक म्हणून लोचन परुळेकर याला नेमण्यात आले होते. लोचनने केलेल्या प्रकारांची माहिती उघड झाल्यानंतर ‘वात्सल्य ट्रस्ट’च्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद नोंदवल्याची माहिती शिक्षणाधिकारी नितीन काळे यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2020 8:49 am