12 November 2019

News Flash

उपचार, दंडाच्या खर्चासाठी बॉम्बचा कट!

खंडणीसाठी धमकावण्याकरिता तीन जणांनी हे कृत्य केल्याचे सांगत पोलिसांनी या प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बॉम्ब तपासाची माहिती देताना पोलीस आयुक्त संजय कुमार.

कळंबोली बॉम्ब प्रकरणाची उकल; नवी मुंबई पोलिसांनी दहशतवादाची शक्यता फेटाळली

कळंबोली येथील न्यू सुधागड शाळेच्या परिसरात हातगाडीवर बॉम्ब आढळल्यापासून या प्रकरणामागे कोण, याबाबत जोरदार तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र सीसीटीव्हीतील दृश्यांची एकमेकांशी सांगड घालून आणि अतिशय गोपनीयपणे आरोपींचा माग काढून पोलिसांनी या कटाचा उलगडा केला. एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणीसाठी धमकावण्याकरिता तीन जणांनी हे कृत्य केल्याचे सांगत पोलिसांनी या प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या तिघांपैकी दीपक दांडेकर याने बॉम्ब बनवला. उलव्यानजीकच्या कोंबडभुजे गावचा रहिवासी असलेल्या दांडेकर याचा दगडखाणीचा व्यवसाय होता. खाणीत स्फोट घडवण्यात येतात. त्यामुळे त्याला बॉम्ब बनवण्याचे ज्ञान होते. त्याने अमोनियम नायट्रेट आणि जिलेटिनचा वापर करून ‘आयईडी’ तंत्राने बॉम्ब बनवला. तर दुसरा आरोपी मनीष भगत याने बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी १२ व्होल्टची बॅटरी, वायरी, अ‍ॅनालॉग घडय़ाळ आणि हातगाडी पुरवली. सुशील साठे याने बॉम्ब असलेली हातगाडी शाळेजवळ ठेवली, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली.

दांडेकर हा कर्जबाजारी झाला होता. त्यातच धनादेश न वटल्याप्रकरणी त्याला एप्रिल महिन्यातच न्यायालयाने २५ लाखांचा दंड ठोठावला होता. त्यापैकी पाच लाख रुपये तातडीने जमा करण्याचे आदेशही त्याला देण्यात आले होते. ही रक्कम उभी करण्यासाठी त्याने खंडणीचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. दांडेकरच्या या कटात भगतही सामील झाला तर, साठे यानेही १२ लाख रुपयांच्या मोबदल्यात त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली. साठे याला गुडघ्याचा विकार असून त्याच्या उपचारासाठी त्याला ही रक्कम आवश्यक होती, असे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपास असा झाला..

* विविध ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी करत असताना बॉम्ब असलेली हातगाडी ढकलताना एक व्यक्ती दृश्यात दिसून आला. मात्र त्याचा चेहरा स्पष्ट नव्हता. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी परिसरातील प्रत्येक सीसीटीव्हीचे फुटेज गोळा करणे, त्यांची तपासणी करणे, खबऱ्यांकडून माहिती घेणे यासाठी सहा पथके तयार केली.

*  ज्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आला त्याच ठिकाणच्या सीसीटीव्ही दृश्यात दुचाकीवर दोन संशयित इसम आढळून आले. मात्र त्यांच्या गाडीचा क्रमांक बनावट होता.अन्य एका चित्रीकरणात दुचाकीवरील दोघे एका कारमध्ये बसलेले दिसत होते. या गाडीच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला असता, त्याने ती गाडी उलवे येथील दांडेकर याला विकल्याचे समोर आले.

*  पोलिसांनी प्रथम दांडेकर याच्यावर नजर ठेवली. त्याच वेळी बॉम्बसाठी वापरण्यात आलेले साहित्य कुठून मिळवले असावे, याचा शोध घेतला. एका भंगारवाल्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सीबीडी बेलापूर येथील दुकानानजीकच्या सीसीटीव्हीची तपासणी केली असता, त्यात दांडेकर आणि भगत आढळून आले. हे सर्व धागेदोरे जुळवून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला व तिघांनाही अटक केली.

आरोपींनी दिलेले कारण त्यांची परिस्थितीजन्य पुराव्यावरून योग्य वाटत असले तरीही हे कारण त्यांनी सांगितलेले असून नेमके का केले याचा तपास सुरू आहे. हे तिघेही दहशतवादी संघटनांशी संबंधित नसून सर्वच बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

– संजय कुमार, पोलीस आयुक्त, नवी मुंबई.

First Published on July 5, 2019 1:08 am

Web Title: navi mumbai time bomb found case abn 97