सिडकोकडून सर्वेक्षण सुरू

नवी मुंबई कामगारांच्या अंतर्गत वादामुळे वीस वर्षांपूर्वी बंद पडलेली वाशी व बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतची हावरक्रॉप्ट सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सिडकोच्या वतीने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. १९९८ मध्ये सुरू झालेली ही सेवा त्या वेळी मुंबई-नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आर्कषणाचे केंद्र होते.

जवळपास १८० रुपये तिकीटदर असलेल्या या सेवेमुळे प्रवाशी २२ मिनिटांत मुंबईत जात होते. एपीएमसीचे व्यापारी व शासकीय अधिकाऱ्यांना या सेवेचा चांगला फायदा होत होता. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय  सिडकोने निर्णय घेतला आहे. याशिवाय नेरुळ ते भाऊच्या धक्यापर्यंत जलवाहतूक करण्यासाठी जेट्टी उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी हा दिवसेंदिवस बिकट प्रश्न निर्माण होत चालला आहे. त्याला मेट्रो, मोना असे उन्नत मार्गाचे पर्याय सरकारकडून काढले जात आहेत. यात जलवाहतूक हा सुलभ आणि किफायतशीर पर्यायाकडे सध्या गांभीर्याने पाहिले जात आहे.

याच वेळी वीस ते बावीस प्रवाशांना सामावून घेणारी हावरक्रॉप्ट सेवा सुरू करण्याचा निर्णय सिडको प्रसासनाने घेतला असून वाशी येथे या सेवेसाठी टर्मिनल्स उभारण्यात आलेला आहे, पण त्याची दुरवस्था झालेली आहे. ही  हावरक्रॉप्ट पाणी आणि जमिनीवर चालत असल्याने पाण्याजवळील जेट्टीवर ती सहज दाखल होत असते. वीस वषापूर्वीच शहराची गरज लक्षात घेऊन सिडकोने ही सेवा सुरू केली होती. त्याचा फायदा नवी मुंबईत राहून मुंबईत कामानिमिततने जाणाऱ्या शेकडो प्रवाशांना होत होता. मात्र खासगी स्वरूपात चालविल्या जाणाऱ्या या सेवेत काही महिन्यांनी वाद निर्माण होऊन ती एक दिवस बंद पडली. सुमारे एक वर्षभरच ही सेवा चालविण्यात आली.

ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्वेक्षणाचे काम दिले असून पायाभूत सुविधांच्या निर्मितीनंतर सिडको ही सेवा पुन्हा सुरू करणार आहे. त्यासाठी पुढील वर्षी जून महिन्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

सर्वप्रथम वाशी टर्मिनल्सवरून सुरू होणारी ही सेवा नंतर प्रतिसाद लक्षा घेऊन बेलापूरहून सुरू करण्यात येणार आहे.

जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात

बीपीटी, जेएनपीटी, मेरीटाईम बोर्ड आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुळ ते भाऊचा धक्का व अलीबाग पर्यंत रो-रो जलवाहतूक लवकर सुरू होणार आहे. सिडकोच्या वतीने नेरुळ येथील अनिवासी भारतीय संकुलाच्या मागे या जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे.