कामोठय़ातील वाहतूक व्यवस्था अनियंत्रीत

पनवेल : कामोठे येथे दहा दिवसांपूर्वी भीषण अपघातामध्ये वृद्ध मोटारचालकाने दोन बळी घेतल्यानंतर नवी मुंबई वाहतूक विभागाने ६० वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेल्या चालकांच्या चालक परवान्यांची नूतनीकरणाची तारीख तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे.

दहा दिवसांपूर्वी बेदरकार वाहन चालविल्यामुळे अनेक परिवार रस्त्यावर आले असले तरी कामोठे वसाहतीमधील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवर अद्याप पोलिसांचे नियंत्रण राहिलेले नाही. अपघातानंतर पोलिसांनी नेमका काय बोध घेतला, असा प्रश्न रहिवाशी विचारत आहेत.

पायी चालणाऱ्या रहिवाशांनी पदपथावरून चालावे असा नियम आहे. मात्र पदपथावर पथारी टाकून व्यवसाय करणारे, दुकानमालकांनी ठेवलेले फलक आणि बेकायदा टपऱ्यांचे वास्तव्य असल्याने नागरिकांना रस्त्याकडून चालण्याचा पर्याय आहे. मात्र कामोठे येथे पदपथासोबत रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात असल्याने नियोजित शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सिडको मंडळाने जेवढय़ा सदनिका बांधण्यासाठी परवानगी दिली. तेवढय़ा पार्किंगची सोय केल्याखेरीज संबंधित इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले असते तर नियोजित शहरात पार्किंगची समस्या निर्माण झाली नसती. विशेष म्हणजे वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी मुख्यमंत्री आले तरी हा प्रश्न सोडवू शकत नसल्याचा दावा करत  आहेत. कामोठे वसाहतीमध्ये बिअरशॉपी, मद्य विक्रीची सुमारे ४० दुकाने आहेत. दूधडेअरीपेक्षा दारूची दुकाने अधिक असल्याने उघडय़ावर आणि वाहनात बसून मद्य पिणे येथील प्रथा बनते आहे.

कामोठे वसाहतीमधील वाहनांची वाढलेली संख्येनुसार येथे स्वतंत्र वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. मद्यपी वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोहीम हाती घेतलेली नाही. कामोठे वसाहतीसाठी स्वतंत्र टोचन गाडी वाहतूक पोलिसांनी तैनात केलेले नसल्याने अवजड वाहनांचा शिरकाव परिसरात होत आहे.

कामोठे येथील अपघाताला वाहतूक विभागाने गंभीर घेतलेले आहे. संपूर्ण नवी मुंबईमध्ये ज्या वाहनचालकांचे वय ६०हून अधिक आहे. त्यांचे चालक परवाने नूतनीकरणाचा कालावधी तपासण्याची मोहीम विभागाने हाती घेतली असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले.

कामोठेवासीयांची शोकसभा

पनवेल : कामोठे वसाहतीमधील भीषण अपघातामधील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कामोठेवासीयांनी रविवारी गर्दी केली होती. सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसह सामान्य नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. ज्या ठिकाणी सेक्टर ६ येथे अपघात झाला त्या घटनास्थळानजीक मोकळ्या मैदानात श्रद्धांजली सभा झाली.

दहा दिवसांपूर्वी कामोठे येथे एका भरधाव मोटारीने सात जणांना ठोकरल्याने त्यामध्ये ३२ वर्षीय वैभव गुरव आणि ७ वर्षीय सार्थक चोपडे यांचे प्राण गेले. अजून पाच जखमी आहेत. अपघातामधील मृतांसाठी कामोठेवासीयांनी एकत्र जमून रविवारी शोक व्यक्त केला. ७५ वर्षीय हरबिंदरसिंग मथारू याच्या चुकीमुळे हे कृत्य झाले, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सखाराम पाटील सामाजिक विकास मंडळ, पश्चिम महाराष्ट्र रहिवासी संघ तसेच इतर सामाजिक संघटनांनी रविवारी शोकसभा आयोजित केली होती. वैभव हा अनेक गृहनिर्माण सोसायटय़ांचे लेखा परीक्षणाच्या कामात मदतनीसचे काम करत होता. त्यामुळे वैभव यांचा परिसरात जनसंपर्क होता. सार्थक चोपडे हा आपल्या पालकांसोबत मटण खरेदी करण्यासाठी आईसोबत सेक्टर ६ येथील रस्त्याकडेला उभा होता. अचानक आलेल्या स्कोडा मोटारीने गुरव व चोपडे परिवारांना दिशाहीन केल्याची भावना रविवारच्या शोकसभेत रहिवाशांकडून व्यक्त करण्यात आली.

कामोठे येथे तात्पुरती वाहतूक चौकी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक पोलीस यापुढे कारवाई करताना दिसतील असे निर्देश स्थानिक वाहतूक विभागाला देण्यात येतील. अवैध पार्किंग रोखण्यासाठी पनवेल पालिकेने भूखंड दिला असून तेथे अवैध पार्किंग विरोधात कारवाया सुरू आहेत. 

– सुनील लोखंडे, पोलीस उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक विभाग