रस्ते बांधकाम ठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचारी अडकले

शेखर हंप्रस, नवी मुंबई</strong>

नवी मुंबई वाहतूक पोलिसांना अजून चार वर्षे रस्ते बांधकामामुळे  होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच काम करावे लागणार आहे. यात वाढही होऊ  शकते मात्र यामुळे  सतत धूळ प्रदूषण ऊन-वारा पावसात उभे राहून कर्तव्य बजावत असताना स्वत:ची काळजी घेण्याची कसरत करावी लागणार आहे. तीन वर्षांपासून याच परिस्थितीला सामोरे जावे लागले असून आता तरी मनुष्य बळ  वाढविण्याची मागणी  केली जात आहे. मनुष्यबळ कमी पडत असल्याने निमशासकीय संस्थांना मदतीसाठी वाहतूक विभागाने साद घातली आहे.

अर्ध्याहून अधिक मनुष्यबळ रस्ते बांधकामाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. सध्या ऐरोली मुलुंड रस्त्याचे काम, जेएनपीटी ते किल्ला उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग-४ ते जेएनपीटी, सानपाडा शीव -पनवेल महामार्ग तसेच सानपाडा रेल्वे स्थानक भुयारी मार्ग, वाशी खाडी पूल दुरुस्ती या ठिकाणी कामे सुरू आहेत. येथील जवळपास प्रत्येक ठिकाणी १५ ते १६ कर्मचारी, तर सानपाडा भुयारी मार्गावर काम सुरू असल्याने वळवलेली वाहतूक नियंत्रित करण्यासाठी  कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. वाहतूक पोलिसांकडे एकूण ४८५ अधिकारी कर्मचारी आहेत.  तसेच शीव  पनवेल, ठाणे बेलापूर, , पुणे मुंबई द्रुतगती मार्गाचा काही भाग असे महामार्ग असून या शिवाय उरण फाटा ते उरण-जेएनपीटी , महापे ते ऐरोली मुलुंड खाडी पूल,पनवेल -कळंबोली ते ठाणे कल्याण मार्ग, पनवेल पुणे जुना महामार्ग या मार्गावरही दिवसरात्र प्रचंड वाहतूक असते. हीवाहतूक नियंत्रित करताना शहरांतर्गत वाहतूकही  नियंत्रित करावी लागत आहे. असलेले मनुष्यबळापैकी रजा , सप्ताहिक सुट्टी आदी कारणांनी ५० तर ६० जण नसतात तर तेवढेच ठिकठिकाणच्या असलेल्या कार्यालय आणि उपायुक्त कार्यालयात  काम करतात त्यामुळे प्रत्यक्षात ३५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडावी लागत आहे. त्यातच आगामी काही दिवसातच खारघर व्हिलेज कळंबोली तळोजा सीबीडी-खारघर  हे चार  उड्डाणपूलतसेच किल्ला  जेएनपीटी येथील उड्डाणपुलाच्या एकीकडील मार्गिकेचे काम संपत आले असून हे काम संपताच दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरू होणार आहे.

वाहतूक पोलिसांना मनुष्यबळ अजून किमान २५०ची गरज आहे. मात्र एवढे मनुष्यबळ मिळण्यास मोठा अवधी लागणार आहे.

आरोग्याचा प्रश्न

बांधकामाच्या ठिकाणी सातत्याने उभे राहून वाहतूक पोलिसांना श्वसनाच्या विविध विकारांना सामोरे जावे लागत आहे. नुकतेच शीव-पनवेल महामार्गावरील खड्डय़ांमुळे होणारी वाहतूक आणि महापे ऐरोली मार्गावरील वाहतूक ऐन पावसात १२ तास कर्तव्य बजावल्याने १० ते १५ कर्मचारी रुग्णालयात भरती करावे लागले होते. सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आरोग्य हासुद्धा घटक विचारात घेणे आवश्यक आहे.

रस्ते बांधकाम होत असताना वाहतूक नियंत्रित करण्यास जादा मनुष्यबळ लागत आहे, तसेच  आगामी काळातही अनेक महत्त्वाचे रस्ते बांधकाम होणार आहेत.

-सुनील लोखंडे, उपायुक्त वाहतूक शाखा