महिनाभरात नवी मुंबई परिवहन उपक्रमाची ४५ लाखांची बचत

नवी मुंबई</strong> : तोटय़ात असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला नव्याने दाखल झालेल्या विद्युत बसने मोठा आधार दिला आहे. या ३० बसमुळे महिनाभरातच परिवहन उपक्रमाची ४५ लाखांची बचत झाली असल्याचे ‘एनएमएमटी’च्या व्यवस्थापकांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून ‘फेम १’ योजनेअंतर्गत ६० टक्के अनुदानातून नवी मुंबई परिवहन सेवेच्या ताफ्यात नुकत्याच ३० विद्युत बस दाखल झाल्या असून पहिल्या टप्प्यासाठी अवघे ९ रुपये तिकीट आकारले जात आहे. मार्ग क्रमांक ९- वाशी रेल्वे स्थानक ते घणसोली घरोंदा, मार्ग क्रमांक २०- घणसोली ते नेरुळ,  मार्ग क्रमांक १२१ घणसोली ते ताडदेव, मार्ग क्रमांक १०५ सीबीडी बस स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानक या मार्गावर सध्या या ३० विद्युत बसची सेवा दिली जात आहे. यातील ९ व १०५ या मार्गावरील प्रवासी सर्वाधिक या बसला पसंती देत आहेत.

एक विद्युत बस साधारणत: दिवसाला १८४ किलोमीटर धावते तर महिन्याला ५ हजार किलोमीटर धावते. प्रत्येक किलोमीटरला या बसला खर्च फक्त ५ रुपये येत आहे. तर डिझेलवरील एका वातानुकूलित बसला अंदाजे ३५ रुपये तर साध्या बसला प्रतिकिमी २३ रुपये खर्च येत आहे. वातानुकूलित बसचा विचार करता नव्याने दाखल झालेल्या विद्युत बसमागे परिवहन उपक्रमाचे एका बसचे १ लाख ५० हजार तर महिनाभरात ३० बसमुळे ४५ लाख रुपयांची बचत होत आहे.

‘फेम २’ अंतर्गत आणखी १०० विद्युत बस परिवहन सेवेत दाखल झाल्यास परिवहनचा प्रतिमहिना होणारा ५.५० कोटीचा तोटा कमी करण्यासाठी या बसमुळे मदत होणार आहे.

निलराणी फायद्याची

पर्यावरणपूरक विद्युत बसमुळे प्रदूषणालाही आळा बसत असून इंधन बचतीलाही हातभार लागत आहे. परिवहनच्या वातानुकूलित ‘व्होल्वो’ बसला प्रति किलोमीटरकरिता ३५ रुपये खर्च होत असून विद्युत बसचा हाच खर्च अवघा ५ रुपये आहे. प्रतिकिलोमीटर ३० रुपयांची बचत होत आहे.

विद्युतबसमुळे प्रदूषणात घट होत असून तोटय़ात असलेल्या परिवहन उपक्रमाची ३० विद्युत बससमुळे महिनाभरात ४५ लाखांची बचत निश्चित आहे. ‘फेम २’ अंतर्गत आणखी १०० बस मिळाल्यानंतर तोटा कमी होण्यास मदत होणार आहे.

-शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी.