चार वर्षांपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या ताब्यातील स्थायी समिती सभापतिपद हिसकावून घेणाऱ्या शिवसेनेने शुक्रवारी सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती सभापती वेळेत उपस्थित नसल्याची संधी साधून ‘मविआ’चा पहिला यशस्वी प्रयोग केला. भाजपचे सभापती नवीन गवते हे सभागृहात उपस्थित नाहीत, हे पाहून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आठ सदस्यांनी एका सदस्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन दहा मिनिटांत दोनशे कोटी रुपये खर्चाच्या नागरी कामांचे प्रस्ताव मंजूर केले.

सत्ताधारी मविआच्या घटक पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामे मंजूर करीत नसल्याचा आरोप गेली काही दिवस करीत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर मविआच्या सदस्यांनी सत्ताधारी पक्षाला चांगलाच झटका दिला. त्यामुळे पालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ही सभा ग्राह्य़ असल्याचा निर्वाळा नगरसचिव चित्रा बाविस्कर यांनी देऊन सत्ताधारी पक्षाला दुसरा धक्का दिला आहे.

नवी मुंबई पालिकेची पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी व प्रशासनाने नागरी कामे मंजूर करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी स्थायी समिती व सर्वसाधारण सभांचा अक्षरश: बार उडविला जात आहे. या साखळीतील या महिन्यातील दुसरी सभा शुक्रवारी १२ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती.

सर्वसाधारण स्थायी समिती सभा ही अकरा वाजता आयोजित केली जाते. मात्र ही सभा एक तास लवकर आयोजित करण्याचे लघुसंदेश सकाळी पाठविण्यात आले. त्यामुळे १६ सदस्य संख्या असणाऱ्या स्थायी समितीत शिवसेना, काँग्रेस व बंडखोर भाजप अर्थात राष्ट्रवादीचे आठ सदस्य सभागृहात उपस्थित राहिले. भाजपचे सभापती व सदस्य सभागृहात नसल्याचे पाहून कोरम पूर्ण झाल्याची कात्री पटल्यावर शिवसेनेच्या सदस्यांनी रंगनाथ औटी यांना हंगामी सभापती म्हणून घोषित केले.

प्रक्रिया अधिनियमानुसारच

औटी यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकाच वेळी वाचून ते मतदानास टाकले. त्यामुळे केवळ दहा मिनिटांत दोनशे कोटी रुपये खर्चाच्या नागरी कामांच्या निविदा मंजूर झाल्या. सर्वानुमते मंजूर झालेल्या या कामानंतर सभागृहात आलेल्या सभापतींनी एक तास सभा अगोदर जाहीर केल्याची कल्पना नसल्याचा कांगावा केला. पण ही सभा महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार ग्राह्य़ असल्याचा निर्वाळा नगरसचिवांनी दिल्याने सत्ताधारी सदस्यांच्या थयथयाटाचा काही उपयोग झाला नाही. चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक सदस्य अपात्र ठरल्याने शिवसेनेने काँग्रेसच्या एका सदस्याच्या मदतीने शिवराम पाटील यांना सभापती केले होते.

सत्ताधारी वेळेवर उपस्थित नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीने नियमानुसार सभेत अध्यक्ष निवडून जनतेच्या रखडलेल्या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करून घेतले.

-रंगनाथ औटी, शिवसेना

आज झालेल्या स्थायी समितीचे कामकाज हे स्थायी समितीच्या नियमानुसार सुरू  करण्यात आले होते. स्थायी समितीच्या नियमानुसार गणसंख्या पूर्ण करण्यासाठी किमान पाच सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. या वेळी आठ सदस्य उपस्थित होते. तसेच यावेळी सभापती उपस्थित नसल्यास नियमात सदस्य अध्यक्ष निवडून सभेचे कामकाज सुरू करू शकतात.

-चित्रा बाविस्कर, सचिव

सत्ताधारी जाणूनबुजून विकासकामांत खीळ घालत आहेत. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीत सभापती वेळेवर उपस्थित नसल्याने तसेच गणसंख्या पूर्ण झाल्याने सभेला सुरुवात करून विकासकामांना मंजुरी मिळवून दिली.

-विजय चौगुले, विरोधी पक्षनेते

सचिवांनी आम्हाला स्थायी समितीची सभा ११ वाजताची सांगितली होती. मात्र, दहा वाजताची सभा आहे, हे बदललेल्या वेळेची कोणतीही पूर्वकल्पना तसेच सचिवांच्या वतीने पत्र मिळाले नाही. सचिवांनी खोटय़ा सहीच्या आधारे ही सभा घेतली. सचिवांना पदावरून हटवण्याची मागणी आम्ही लेखी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करणार आहोत. सभा नव्याने घेण्याची मागणी करणार आहोत.

-नवीन गवते, सभापती, स्थायी समिती