भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड

नवी मुंबई नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण गेल्या आठवडय़ातच भरल्याने आता वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली, असे म्हणत समाधान व्यक्त करणाऱ्या नवी मुंबईकरांचे आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी पाण्याअभावी हाल झाले. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील विजेचा दाब अचानक वाढल्यमुळे तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला. मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या कामोठे व इतर भागांतही नागरिकांचे त्यामुळे हाल झाले.

नवी मुंबई शहराला दररोज मुबलक पाणीपुरवठा केला जातो. मोरबे धरणातून दिवसाला ४२० एमएलडी पाणी शहरासाठी घेतले जाते. या धरणातून घेण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी भोकरपाडा येथे शुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातील विजेचा दाब सोमवारी अचानक वाढला. त्यामुळे सीटी अर्थात करंट ट्रान्स्फॉर्मर पहाटे चारच्या सुमारास जळाला. परिणामी सकाळी शहराला अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा झाला. त्यानंतर येथे दुरुस्तीचे काम सुरू झाल्यामुळे दिवसभर शहरात पाणीपुरवठा झालाच नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिकाक्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, सानपाडा, ऐरोली, दिघा अशा सर्वच विभागांतील नागरिकांचे पाण्याअभावी हाल झाले.

कार्यालय गाठण्याच्या गडबडीत असलेल्यांची तारांबळ उडाली. महापालिकेने तात्काळ दुरुस्ती हाती घेतली. परंतु पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने काम लांबले. शहरात नेहमीच पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्यामुळे घरात पाणी साठवले जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे अचानक पाणी गेल्यामुळे रहिवाशांच्या दैनंदिन व्यवहारांत अडथळे आले. अनेक रहिवाशांना पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागल्या. पाणी का गेले आणि पाणीपुरवठा सुरळीत कधी होणार, याची माहिती मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सायंकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मंगळवारी सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पालिका पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी दिली.

सोमवारी  सकाळी अतिशय कमी पाणी आले. सकाळी पुरेसे पाणी आले की दिवसभर कोणतीच अडचण येत नाही. परंतु सोमवारी दिवसभर व रात्रीही पाणी नसल्याने प्रचंड हाल झाले.

– प्रवीण निपाणे, रहिवासी, सीवूड्स

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील विजेचा दाब अचानक वाढल्यामुळे भोकरपाडा येथील केंद्रावर सीटी अर्थात करंट ट्रान्स्फॉर्मरमध्ये मोठा बिघाड झाला. त्यामुळे शहरात सकाळपासूनच पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पालिकेने तात्काळ दुरुस्ती केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.

– मनोहर सोनावणे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग