21 April 2019

News Flash

 ‘हरितपट्टया’साठी महामुंबईकर सरसावले

वाढत्या खारफुटी आणि कांदळवनामुळे महामुंबई क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाण्याचे स्रोत आणि पाणथळ जमिनी आहेत

(संग्रहित छायाचित्र)

११०० हेक्टर पाणथळीच्या जागा; समाजमाध्यमावर एकत्र येण्याचे आवाहन; सामाजिक संस्था स्थापण्याच्या हालचाली

नवी मुंबई : पाण्याचे स्रोत आणि पाणथळीच्या जागा हे नागरिकांचे मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील दुसऱ्या प्रस्तावित गोल्फ कोर्सला मज्जाव करताना दिला आहे. त्यामुळे ऐरोलीपासून पनवलेपयर्र्त असलेल्या सुमारे ११०० हेक्टर जमिनीवरील पाणथळीच्या जागा वाचविण्यासाठी महामुंबईकर सरसावले आहेत. त्यासाठी समाजमाध्यमावर एकत्र येण्याचे आवाहन केले जात असून सामाजिक संस्था स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.

नवी मुंबईला साठ किलोमीटर लांबीचा खाडीकिनारा लाभल्याने कांदळवन, खारफुटी, पाणथळ, जैवविविधता यांचे प्रमाण जास्त आहे.

राज्य शासनाने ४० वर्षांपूर्वी नवी मुंबई शहर प्रकल्प हा ठाणे खाडीच्या खारजमिनी व मिठागरांवर भराव टाकून निर्माण केलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईत विशेषत: उरणमध्ये पाणथळीच्या जागा मोठय़ा प्रमाणात आहेत. खारघर मधील अभिव्यक्त नावाच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात एकटय़ा खारघरमध्ये ११० हेक्टर पाणथळ जमीन आहे. ही संस्था महामुंबई क्षेत्रातील सर्व पाणथळ जमिनींचा सव्‍‌र्हे करीत आहे. त्सुनामीनंतर उच्च न्यायालयाने खारफुटी संरक्षण कायदा तयार केला आहे. त्यामुळे खाडीकिनारी असलेल्या खारफुटीचे जंगल वाचविण्याची जबाबदारी स्थानिक स्वायत्त संस्थावर येऊन ठेपली आहे. वाढत्या खारफुटी आणि कांदळवनामुळे महामुंबई क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाण्याचे स्रोत आणि पाणथळ जमिनी आहेत.

शेतजमिनी व मिठागरावंर संपूर्ण ग्रामीण जीवन चालणाऱ्या बेलापूर, पनवेल, उरण या तीन तालुक्यातील १६ हजार हेक्टर जमीन सिडकोने संपादित करून नवी मुंबई शहराची निर्मिती केली आहे. त्या वेळी अस्तित्वात नसलेल्या सागरी नियंत्रण कायदा आणि खारफुटी संरक्षण कायद्यामुळे या भागातील खाडीकिनाऱ्यावर कोटय़वधी मेट्रिक टन मातीचे भराव टाकून सपाट जमीन तयार करण्यात आली असून त्यावर इमले बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे महामुंबई क्षेत्रात काही फूट खोदल्यानंतर पाणी लागत असल्याचा अनुभव आहे. या क्षेत्राला लाभलेला खाडीकिनाऱ्यावर यामुळे पाणथळीच्या जागा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. हा परिसर सुमारे १ हजार १०० हेक्टर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोकणातील पाणथळ जमिनींचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. महामुंबई क्षेत्रातील सर्वेक्षण अद्याप झालेले नाही. या पाणथळीच्या जागांवर देश विदेशातून पक्षी येत असतात. त्यात फ्लोमिंगोचे प्रमाण जास्त आहे. पामबीच मार्गावरील ८० हेक्टर जमिनीचे आरक्षण बदलून त्या ठिकाणी गोल्फ कोर्स आणि त्याची अ‍ॅकाडमी उभारण्याचा प्रकल्प एका बडय़ा उद्योजकाने आखला होता. नेरुळ अनिवासी भारतीय संकुलातील काही रहिवाशांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या नवी मुंबई एन्व्हायर्न्मेंट प्रिझव्‍‌र्हेशन सोसायटी या संस्थेच्या प्रयत्नामुळे हे मनुसुबे धुळीस मिळाले असून हा हरितपट्टा कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच संस्थेंच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सिडको व पालिकेला या पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

नवी मुंबई इतर शहरांच्या तुलनेने सुंदर शहर आहे. पूर्व बाजूस पर्वत रांगा आणि पश्चिम बाजूस खाडीकिनारा यामधील भागात हे शहर वसले आहे. त्यातील जैवविविधेतचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे. त्यासाठी आम्ही पाणथळ जमिनींचे खासगी सर्वेक्षण हाती घेतले असून यासाठी एमएमआरडीएसारख्या शासकीय संस्थांची मदत अपेक्षित आहे.

– नरेश चंद्र सिंग, अध्यक्ष, अभिव्यक्त, सामाजिक संस्था, खारघर

* एकटय़ा खारघरमध्ये ११० हेक्टर पाणथळ जमीन आहे.

* महामुंबई क्षेत्रातील सर्व पाणथळ जमिनींचे  सव्‍‌र्हेक्षण सुरु.

First Published on November 8, 2018 1:56 am

Web Title: navi mumbaikar came out to save green belt