एका दिवसात ५२ वाहनचालकांवर कारवाई
नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील विस्तीर्ण रस्त्यावर धूम स्टाईलने दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून पामबीच, खारघर, एमआयडीसी या रस्त्यावर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २३४ वाहनचालकांवर अवघ्या १५ दिवसांत नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या वाहनचालकांना दोन हजार रुपये दंड आणि वाहन परवाना जप्त करण्याची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. यावरून नवी मुंबईत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसून येते.
१२ लाख लोकवस्तीच्या या सायबर सिटीत सर्वाधिक दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी केली जाते. त्यामुळे वाहन चालविणाऱ्यांच्या संख्या जास्त असून आता रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यात संध्याकाळच्या वेळी वाहन चालविण्यात तळीरामांची संख्या जादा असून यात दुचाकी चालक आघाडीवर आहेत. नवी मुंबई वाहूतक विभागाचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी एक ते पंधरा मे दरम्यान मद्यपी वाहनचालकांना शोधण्याची विशेष मोहीम हाती घेतली होती. मोक्याचे चौक आणि रहदारीच्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी दहा श्वास तपासणी यंत्राद्वारे केलेल्या तपासणीत २३४ वाहनचालकांनी मद्यपान केल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर परवाना जप्तीची कारवाई करण्यात आली असून फौजदारी न्यायालयातून हा परवाना त्यांना सोडवावा लागणार आहे. विशेष म्हणजे १५ मे रोजी रविवारी एकाच दिवसात ५२ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली असून ही कारवाई तुर्भे, एपीएमसी, सी वूड या भागात जास्त आहे. पंधरा दिवसात ही कारवाई केली असता इतक्या मोठय़ा प्रमाणात मद्यपी वाहन चालविताना दिसून आले मागील सहा महिन्यात ही संख्या १३४ तळीरामांची आहे. गतवर्षी ही संख्या ७१८ मद्यपींची असून दोन वर्षांपूर्वी ५८४ होती. नवी मुंबई पालिकेने अलीकडे सिमेंट कॉँक्रीटच्या रस्त्याचे जाळे शहरभर विणले आहे. त्यामुळे भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यांच्यावर कारवाई सक्तीने केली जाणार असल्याचे साळवे यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी तीन श्वास तपासणी यंत्रे आणली जाणार आहेत.