फुलांच्या किमतीत वाढ; २५० रुपयांपर्यंत खर्च

नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला घरोघरी घट बसविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत चांगलीच गर्दी होती. महागाईमुळे घटस्थापनेसाठी १५ आवश्यक साहित्य असलेल्या नारळ, पत्रावळी, धान्य, माती, फुले व आदी साहित्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने एक घट बसविण्यासाठी जवळपास २०० ते २५० रुपये खर्च येत असल्याने खिशालाही चाट बसणार आहे.

वाशीतील एपीएमसी बाजारात देवीच्या सजावटीच्या साहित्यांची अनेक दुकाने थाटली आहेत. देवीची साडी, चुनरी, गंगावन, सांज शंृगार तसेच घट, ओटीचे साहित्य, पूजा-प्रसाद साहित्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. लहान आकारापासून मोठय़ा आकारातील घट उपलब्ध आहेत. काळया रंगाचे साधे घटही बाजारात मिळत आहेत. तसेच रंगीबेरंगी आरसे, मोती, मनी जरीचे वर्क ग्राहकांना आकर्षित करत आहेत. आकर्षक आरसे, मोत्याच्या माळा लावून सजवलेले घट दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आहेत.

झेंडूचा बाजार जोरात

झेंडूच्या फुलांना नवरात्रोत्सवापासून मोठे महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. घटस्थापनेच्या पाश्र्वभूमीवर अनेक विक्रेत्यांनी मोठय़ा प्रमाणावर झेंडूची फुले बाजारात आणली आहेत. गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी झेंडूची लागवड कमी झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या झेंडूच्या फुलांची ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. या दरात उद्या वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

गरबा दांडियाची जय्यत तयारी

नवी मुंबईत असलेले नवरात्रोत्सव मंडळ व सामाजिक संस्थेच्या वतीने गरबा दांडियांचे आयोजन करण्यात येते. दांडिया खेळण्यासाठी रिंगण तयार करण्याचे काम जोराने सुरू असून काही मंडळांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. गरबा-दांडियामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धातील विजेत्यांना व दांडियामधील सहभागीसाठी उत्कृष्ट ड्रेस, गरबा क्वीन, किंग यांची निवड करण्यात येते.

मंडळाचे काम अंतिम टप्प्यात

शहरात अनेक मंडळांच्या वतीने दुर्गादेवीची स्थापना केली जाते. त्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची घटस्थापनेच्या पूर्वसध्येला धावपळ सुरू होती. मंडप उभारणी, सजावट, रोषणाई, मूर्तीची खरेदी, विविध कार्यक्रमांचे नियोजन, गरबा दांडिया आदींचे नियोजन आदीत कार्यकर्ते गर्क आहेत.