24 February 2021

News Flash

देवीच्या पूजनासाठी शहाळ्याचे मुखवटे

बाजारात विविध प्रकारचे देवीचे मुखवटे असले तरी शहाळ्यापासून देवीचे मुखवटे फक्त उरण तालुक्यातच तयार होतात.

दिलीप पाटील यांनी ५० वर्षांपासून जपलेली कला, कुटुंबाचाही सहभाग

नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते. शाडूच्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि धातूच्या मूर्तीसह देवीच्या मुखवटय़ांचीही पूजा केली जाते. बाजारात विविध प्रकारचे देवीचे मुखवटे असले तरी शहाळ्यापासून देवीचे मुखवटे फक्त उरण तालुक्यातच तयार होतात. उरणमधील नागाव येथील दिलीप पाटील व कुटुंबियांनी शहाळ्यापासून देवीचे मुखवटे तयार करण्याची  कला गेल्या पन्नास वर्षांपासून टिकवून ठेवली आहे.

नारळाच्या झाडाला कल्पवृक्षच म्हटले जाते. कल्पवृक्षापासून मिळणाऱ्या शहाळ्याला धारदार सुरीने आकार देऊन  उरण तालुक्यातील नागावचे ६२ वर्षीय दिलीप पाटील हे नवरात्रोत्सवाच्या कालावधीत पूजनासाठी लागणारे देवीचे मुखवटे तयार करतात. मागील ५० वर्षांपासून ते हा व्यवसाय करीत असून या कामात त्यांचे कुटुंबीय, मित्र व त्यांच्या मुली त्यांना मदत करत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. हे मुखवटे तयार करताना शाहाळे घेऊन त्याला मुखवटय़ाचा आकार दिला जातो. त्यानंतर या शाहाळ्यावर पोस्टरच्या रंगाने रेखीव रंगकाम करून मुखवटा तयार केला जातो. नवरात्रोत्सवाच्या किमान १५ ते २० दिवस अगोदर या मुखवटे तयार करण्यास सुरुवात केली जाते. दरवर्षी किमान २०० पेक्षा अधिक मुखवटय़ांची मागणी येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. तांब्याच्या भांडय़ात नऊ  दिवस ठेवण्यात येणाऱ्या या देवीच्या मुखवटेरूपी घटांचे दसऱ्याच्या दिवशी विधिवत विसर्जन केले जाते.

पाटील यांची कला आजूबाजूच्या जिल्ह्यातही प्रसिद्ध असून मुखवटय़ांसाठी दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. मात्र, मुखवटे बनविण्यासाठी विशिष्ट आकाराचे नारळ लागत असल्याने या मुखवटय़ांची संख्या मर्यादितच ठेवली असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 12:32 am

Web Title: navratri utsav idols of devi worship
Next Stories
1 नागरी उड्डाण राज्यमंत्र्यांकडून विमानतळ जागेची पाहणी
2 विकास आराखडय़ात विघ्न
3 नवरात्रीत कोंडीबहाद्दर मंडळांना पालिकेचा चाप
Just Now!
X