भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांच्या मदतीने नवी मुंबईत राष्ट्रवादीला धक्का देण्याची सारी तयारी शिवसेनेने केली होती. पण ऐन वेळी भाजपने अंग काढून घेतल्याने सत्ता कायम राखण्याचा राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला. भाजपने ऐन वेळी पाठिंबा देण्याचे टाळल्याने त्याची वेगवेगळी चर्चा रंगली असली तरी भाजप आणि राष्ट्रवादीतील पडद्याआडील समझोता कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

महापौरपदासाठी गेली दोन महिने शिवसेनेच्या गोटात हालचाल सुरु होती. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे आणि विजय चौगुले यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. त्यासाठी राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांना हेरण्यात आले होते. शिवसेनेचे ३८ आणि मित्रपक्ष भाजपाचे ६ असे ४४ नगरसेवकांचे संख्याबळ गृहीत धरण्यात आले होते. चौगुले यांची पक्षाने कोणतीही अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसताना त्यांनी ही जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली होती.

राष्ट्रवादीचे सहा ते सात नगरसेवक गळाला लागतील असा त्यांना विश्वास होता. त्यासाठी नाराज राष्ट्रवादी, भाजपा, आणि अपक्ष नगरसेवकांची ‘दिवाळी’ कशी चांगली साजरी होईल यांची काळजी घेण्यात आली होती. अचानक नगरसेवकांचा भाव वधारला होता आणि घोडेबाजाराला चालना मिळू लागली होती. शिवसेना भाजपाचे ४४ आणि राष्ट्रवादीचे सहा असे ५० नगरसेवकांचे गणित जुळल्यानंतर काँग्रेस शिवसेनेला साथ देऊन राष्ट्रवादीचा वचपा काढणार होती. मात्र निवडणुकीच्या चार दिवस अगोदर भाजपाने शिवसेनेला साथ न देण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसने लागलीच कोलांटीउडी मारली. राष्ट्रवादीला साथ देऊन उपमहापौर पद व काही विशेष समित्यांची तडजोड केली गेली.

सरकारचा त्रिवर्षेपूर्ती सोहळा राज्यात साजरा होत असताना शिवसेनेने घोटाळेबाज भाजपा नावाची पुस्तिका काढून भाजपाच्या जखमेवर मीठ चोळले होते. या नाराजीचा पहिला फटका शिवसेनेच्या पर्यायी चौगुले यांच्या नवी मुंबई महापौर पद काबीज करण्याच्या इच्छेला बसला. शिवसेनेला पाठिंबा न देण्याचे हे एक प्रमुख कारण असले तरी दुसरे कारण शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चौगुले होते. चौगुले यांनी भाजपाच्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांना आपल्या तंबूत खेचले होते. ते त्यांना सोबत घेऊनच फिरत होते. त्यामुळे भाजपाने अधिकृत पाठिंबा दिला नसता तरी ते चार नगरसेवक वेगळा गट करुन चौगुले यांना मतदान करण्यास तयार होते. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी भाजपाची मुंबईत मनसेच्या फूटीप्रमाणे नामुष्की झाली असती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या फुटीची कुणकुण लागल्यानंतर चौगुले यांना वर्षांवर बोलवून उमेदवारी अर्ज न भरण्याचा आदेश दिला. भाजपाने आपल्या सहा नगरसेवकांची साथ शिवसेनेला न देण्याचा निर्णय घेतला. त्याच ठिकाणी ही निवडणूक राष्ट्रवादीने जिंकल्यात जमा होती.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांची पत्नी वैजयंती भगत यांनी या निवडणूकीत बंडखोरी केली. त्यांना केवळ त्यांच्या कुटुंबातील नगरसेवकांची तीन मते मिळाली. हे भगत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी व्हावी यासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील होते. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन एका नाईक पुत्राने दिले होते. त्यांनी माघार न घेता निवडणूक लढवली आणि आपले हसे करुन घेतले.

लोकसभा निवडणुकीची किनार?

ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडे तगडा उमेदवार नाही. त्या दृष्टीने भाजपने सध्या चाचपणी सुरू केली आहे. नाईक कुटुंबियांना गळाला लावण्याचे प्रयत्न होऊ शकतात. ही किनार महापौरपदाच्या निवडणुकीत नाही ना, अशीही चर्चा रंगली आहे.