नवी मुंबई : नवी मुंबई पालिका निवडणुकीत काठावर पास झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा नगरसेवकांचा पांठिबा देऊन पालिकेच्या सत्तेत समान भागीदार झालेल्या काँग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घडय़ाळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनगटावर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघांपैकी एका मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राष्ट्रवादीने येथील दोन विधानसभा व एक लोकसभेवर आपला हक्क कायम ठेवला आहे.

आघाडी झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील निवडणुकीतील उमेदवारांची उमेदवारी जवळपास निश्चित मानण्यात आलेली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी मंत्री गणेश नाईक यांना देण्यात यावी, असा प्रस्ताव स्थानिक काँग्रेस नेत्यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मांडलेला आहे. नाईक यांचा बेलापूरमधील पत्ता कट होऊन त्यांची रिक्त होणारी विधानसभा जागा काँग्रेसला मिळावी असा यामागचा मूळ उद्देश आहे. तसा प्रस्ताव येथील काँग्रेसने पक्षश्रेष्ठीकडे मांडलेला आहे, पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी धर्मात मागील निवडणुकीप्रमाणेच नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा आणि ठाणे लोकसभा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला जाण्याची शक्यता स्पष्ट करण्यात आलेली आहे. केंद्रीय काँग्रेस समितीच्या वतीने दाक्षिणात्य नेते संदीपन यांनी नुकतीच कोकण भागातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यात नवी मुंबईतील दोन मतदारसंघांचाही समावेश आहे. कोकणात काँग्रेस पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे. त्यामुळे कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईतील दोन मतदारसंघांवर दावा सांगून उपयोग नसल्याचे येथील काही कार्यकर्त्यांनी संदीपन यांच्या कानावर घातले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील एका जागेवर दावा करण्याचे मनसुभे येथील काँग्रेस नेत्यांचे धुळीस मिळालेले आहेत. त्यात नवी मुंबई काँग्रेसमध्ये कोणाचाही पायपोस कोणाच्यात नाही. पक्षाचे नवीन अध्यक्ष अनिल कौशिक हे दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आजही  प्रयत्नशील आहेत. त्यांना सरचिटणीस संतोष शेट्टी व माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांची साथ आहे.